धक्कादायक! मुलीची शाळेची फी भरण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या, असं उलगडलं खूनाचं गूढ
बिहारची राजधानी पाटण्यात चार दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येमागील कारणांची आणि आरोपींच्या भूमिकांची माहिती आता हळूहळू समोर येत आहे. या खूनप्रकरणात पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली असून, या हत्येचा कट अशोक साव नावाच्या व्यक्तीने रचल्याचे निष्पन्न झाले आहे. जमीनविवादातून खेमका यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे.
बिहारचे पोलीस महासंचालक (DGP) विनय कुमार यांनी ८ जुलै रोजी पत्रकार परिषदेत या हत्येप्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. या प्रकरणातील मुख्य शूटर उमेश यादव याला अटक करण्यात आली असून, त्याने केवळ ४० हजार रुपयांच्या अॅडव्हान्सवर ही सुपारी स्वीकारल्याचे समोर आले आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या अॅडव्हान्समधून उमेशने आपल्या मुलीच्या शाळेची ४५ हजार रुपयांची फी भरण्यासाठी रक्कम खर्च केली.
पोलिस तपासात असेही समोर आले की, उमेश यादव गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. मुलीची फी भरता न आल्यामुळे तो खूपच तणावात होता. त्याच दरम्यान आरोपी अशोक सावने त्याच्याशी संपर्क साधून खेमका यांना ठार मारण्यासाठी चार लाखांची सुपारी दिली. उमेशने लगेच अॅडव्हान्स रक्कम घेतली आणि त्यातून सर्वप्रथम आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला.
या घटनेमुळे बिहारमधील वाढती गुन्हेगारी, जमीनविवादातील हिंसक वळण आणि आर्थिक विवंचनेतून गुन्हेगारीकडे वळणाऱ्या लोकांचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित दुचाकीची ओळख पटवली आणि त्यावरून उमेश यादवपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं आहे.
त्याच्या अटकेनंतर चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या असून, पोलीस खात्याच्या मते या प्रकरणात अजूनही काही बड्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. अशोक साव आणि खेमका यांच्यातील जमीनविवाद ही संपूर्ण हत्याकांडाची मुळं असून, आर्थिक आणि सामाजिक पातळीवरील असमतोल गुन्हेगारीला कसा खतपाणी घालतो, याचे हे विदारक उदाहरण ठरत आहे.
Chandrashekhar Azad : चंद्रशेखर आझाद आणि भाजप नेत्याच्या गुप्त बैठका, रोहिणी घावरीच्या दाव्याने खळबळ
दरम्यान, या प्रकरणामुळे बिहारमधील राजकीय वातावरणही तापले असून, वाढत्या सुपारी किलिंगच्या घटनांवरून सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता पुढील तपासातून आणखी कोणकोणाची नावं बाहेर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.