नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देश-विदेशातील राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मंडळी कर्तव्यपथावर दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच युक्रेनचे पंतप्रधान डेनिस शमीहाल यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वशांतीसाठी काम करत आहेत, असे कौतुकोद्गार शमीहाल यांनी काढले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना डेनिस शमीहाल म्हणाले की, भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याबद्दल आम्ही कौतुक करू इच्छितो. लोकशाही आणि विविधतेतील एकता या मूल्यांची केलेली जपणूक हीच खरी भारताची व्याख्या आहे. भारत हा सर्वांत मोठा लोकशाही असलेला देश आहे. मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये त्याचा समावेश होतो, असे शमीहाल यांनी नमूद केले.
देश आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुक्रवारी (२६ जानेवारी) सकाळी ते दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले, जिथे त्यांनी देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे युद्ध स्मारकावर उपस्थित होते. यावेळी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पीएम मोदींच्या लूकची बरीच चर्चा झाली.
रंगीबेरंगी पगडीने वेधले लक्ष
पंतप्रधान मोदींनी घातलेली रंगीबेरंगी पगडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पंतप्रधानांच्या पगडीचा रंग प्रामुख्याने पिवळा असून, हा रंग भगवान रामाशी संबंधित मानला जातो. पगडी व्यतिरिक्त पारंपारिक कुर्ता आणि पायजमा घालून पंतप्रधान आले. त्यांच्या कुर्ता आणि पायजमाचा रंग पांढरा तर तपकिरी रंगाचे जॅकेट त्यांनी घालते होते.