मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपण्याचे श्रेय वारकरी संप्रदायाला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असताना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे, 21 वर्षांच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे. म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन फडणवीस म्हणाले, अर्जुनाला कर्म मार्ग दाखविण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली, गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे. भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्ण कलश चढविला गेला. सुवर्ण कलशासोबत महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित 'सुवर्ण कलशारोहण' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुवर्ण कलशाचे पूजन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान… pic.twitter.com/MTvpIY6FRS— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2025
भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्त्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे. माऊलींनी 9 हजार ओव्यांच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी(सार्थ) ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेतस्थळाचे उद्धाटन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा 22 किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढविण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.