नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशातून रोष व्यक्त करण्यात येत होता. तसेच बदला घेण्याची मागणी केली जात होती. यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय दलांनी दिलेल्या माहितीमध्ये 400 हून अधिक ड्रोनचे हल्ले पाकिस्तानने केल्याचे सांगण्यात आले. भारताने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तीन दिवस ही युद्धपरिस्थिती झाल्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागला. दरम्यान, भारत पाकिस्तान युद्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. युद्धविराम लागल्यानंतर देखील पाकिस्तानकडून तीन तासांमध्ये याचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यामध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ९ मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या संवादावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत ठणकावून भूमिका घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असं पंतप्रधान मोदीनी जेडी व्हान्स यांना सांगितले.
भारत पाकिस्तान युद्धांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामाच्या घोषणनेनंतर रविवारी समोर आलेल्या तपशीलानुसार, ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने ऑपरेशन सिंदूर ची कारवाई केल्यानंतर सरकारकडून लष्कराला काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पाकिस्तानने आगळीक केली तर जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मोदींनी लष्कराला दिल्या होत्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, ‘जर तिकडून गोळ्या चालवल्या तर इकडून गोळे चालतील, असा इशारा मोदींनी दिला होता.
तणावपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर आता दिल्लीमध्ये बैठकीचा वेग वाढला आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जात आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.