उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारत पाकिस्तान युद्धावर दिली प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
रायगड : भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन दिवसांच्या युद्धानंतर युद्धविराम लागला आहे. पहलगाम येथे भारतीय पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये 26 जणांची निर्घृण हत्या झाली. यामुळे भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यामध्ये भारताने दहशतवादी तळ्यांवर हल्ला करुन 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन दिवस युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेवर आता राज्यातील नेत्यांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “पाकिस्तानलाही माहिती आहे की भारताशी लढणे सोपे नाही. भारताशी लढलो तर आपलं अस्तित्व नाहीसं होईल हे पाकिस्तानला माहित आहे,” असा आक्रमक पवित्रा एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदे भारत पाकिस्तान युद्धाबाबत म्हणाले की, “पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करुन सुरुवात केली होती. त्यांना आपण उत्तर दिलं. त्यानंतर शस्त्र विराम दोन्ही देशांनी चर्चा करुन केला होता. मात्र पाकिस्तानने बेईमानी केली. पाकिस्तानने अशा पद्धतीने याआधीही अनेकदा शस्त्रविरामाचं उल्लंघन केलं होतं. पण मोदींनी त्यांना आणखी एक संधी दिली. तरीही आपल्या नागरिकांवर पाकिस्तानने हल्ला केला. मात्र त्याचा करारा जवाब पाकिस्तानला देण्यात आला आहे. पाकिस्तान पुन्हा हल्ला करेल असं भारतीय लष्कराला वाटलंही होतं. त्यामुळे शस्त्रविरामासंदर्भात कुठलीही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नव्हती. आता पाकिस्तान जर वारंवार जर या गोष्टी करणार असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल.”
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “पण असं आहे की कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं आणि ते वाकडं राहतचं. पाकिस्तानची प्रवृत्ती अशीच आहे. कुत्र्याचं शेपूट वाक़डं असल्यामुळे ते कापलं जातं. वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हेच करतील. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागलं पाहिजे. अन्यथा नकाशावरुन पाकिस्तानचं नाव कायमचं गायब करण्याची क्षमता भारतामध्ये आहे,” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
काय म्हणाले भुजबळ?
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “कुठलंही युद्ध हे कधीतरी थांबत असते. ते योग्य वेळी थांबलं पाहिजे. अमेरिकेन आधी सांगितलं होतं, हा आमचा प्रश्न नाही. अमेरिकेने ही घोषणा केली मात्र पुन्हा युद्ध सुरू झाले होते. सध्या युद्ध थांबले आहे. हे समजत आहे. आमच्या लोकांवर हल्ला केला त्याचा सैन्याने मोठा बदला घेतला. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यासारखा नाही हे खरं आहे. त्यांना हा मोठा धडा मिळाला आहे. पुढे कुरापती होणार नाही असे वाटत नाही. अनेक दहशतवादी यात ठार झाले आहे. युद्ध थांबले असेल तर चांगलं आहे,” अशी प्रतिक्रिया नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.