नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकांत (Karnataka Election Results 2023) भाजपावर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या. राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालेलं असतानाच गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री (Karnataka CM) कोण होणार यावरुन वादंग सुरु आहे. दिल्ली दरबारी हा प्रश्न गेला असून प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (D K Shivkumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) या दोघांत या पदासाठी स्पर्धा आहे. दोन्ही नेत्यांच्या नावावर 16 मे रोजी राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. डी के शिककुमार यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी ब्लॅकमेल करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय सोनिया गांधी करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना 60.9 टक्के मत मिळाली आहेत. तर डी के शिवकुमार हे कनकपुरा जागेवर विजयी झाले आहेत. त्यांना 75 टक्क्यांहून जास्त मतं मिळाली आहेत. या दोन्ही नेत्यांचा विचार केल्यास डी के शिवकुमार यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचं सांगण्यात येतंय. तर सिद्धरामय्या यांच्याकडे शिवकुमार यांच्या तुलनेत 2800 टक्के संपत्ती कमी आहे.
डी के शिवकुमार यांच्याकडे किती आहे संपत्ती?
डीके शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाकडं दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या परिवाराकडे 1413 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. 14,13,80,02,404 रुपयांची मालमत्ता त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली आहे.
1. एकूण 273 कोटींची जंगम मालमत्ता आहेत. यातील 240 कोटींची जंगम मालमत्ता एकट्या डी के शिवकुमार यांच्या नावावर आहे.
2. डीके शिवकुमार यांच्या पत्नीच्या नावे 20 कोटींची संपत्ती आहे.
3. 1140 कोटी म्हणजे 11,40,38,41,398 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
4. स्थावर मालमत्तेपैकी 970 कोटींची मालमत्ता डीके शिवकुमार यांच्या नावावर आहे.
5. 113 कोटींची स्थावर मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे.
6. डीके शिवकुमार यांच्या कुटुंबावर 503 कोटी रुपयांचे कर्जही आहे.
डीके शिवकुमार यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय?
प्रतिज्ञापत्रात डी के शिवकुमार आणि शेती आणि व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत असल्याचं नमूद केलेलं आहे. राज्यशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी पूर्ण केलेलं आहे. शिवकुमार यांच्या पत्नी उषा शिवकुमार याही व्यावसायिक आहेत. 1993 साली या दोघांचा विवाह झाला. त्यांना 3 मुलं आहेत त्यात 2 मुली एक मुलगा आहे. मुलींची नावं ऐश्वर्या, आभरणा आणि मुलाचं नाव आकाश आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचं म्हणजे ऐश्वर्याचं लग्न कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांचा मुलगा अमर्त्य याच्याशी झालेला आहे. ऐश्वर्या या ग्लोबल अकादमी ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालकही आहेत. या कॉलेजची स्थापना डी के शिवकुमार यांनी केलेली आहे.
सिद्धरामय्या यांची संपत्ती किती?
1.सिद्धरामय्या यांनी निवडणूक आयोगाकडं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 51 कोटी म्हणजेच 51,93,88,910 रुपये इतकी आहे.
2. सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्या नावे 21 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
3. तर या दोघांच्या नावे 30 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्याकडे 9 कोटी तर पत्नीकडे 20 कोटींची जंगम मालमत्ता आहे.
4. सिद्धरामय्या यांच्या कुटुंबावर 23 कोटी रुपयांचं कर्जही आहे.
सिद्धरामय्या यांच्या उत्पन्नाचा स्रोत
व्यवसाय हा उत्पन्नाचा स्रोत असल्याचं सिद्धरामय्यांनी सांगितलेलं आहे. सिद्धरामय्या यांनी वकिलीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. सिद्धरामय्या आणि पार्वती यांना राकेश आणि यतिंद्र अशी दोन मुलं आहेत. कन्नड सिनेसृष्टीत कार्यरत असलेले राकेश यांचा 2016 झाली मृत्यू झालाय. तर यतिंद्र हे डॉक्टर आहेत.