जम्मू काश्मिरात आभाळ फाटले; तिघांचा मृत्यू, १०० जणांना वाचवले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेत ४० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, अनेक घरांमध्ये माती, दगड आणि पाण्याचा ढिगारा शिरला आहे.
या भयावह घटनेनंतर डोंगराळ भागातून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली काही घरे व लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत, मात्र प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आहे.
या आपत्तीमुळे रामबनमधील कुंड गाव सर्वाधिक प्रभावित झाला असून, त्या भागातील बहुतांश कुटुंबांचे घर, शेतीसह संपूर्ण संसार उध्वस्त झाला आहे. नाशरी ते बनिहालदरम्यानचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. किश्तवार-पद्दर मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना हवामान साफ होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राजगड शिवापट्टणवाडा स्थळांच्या उत्खननात सापडले वाड्याचे अवशेष; शिवकालीन शहराचे दर्शन
उधमपूरचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी बसीर-उल-हक यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, “रामबन परिसरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, भूस्खलनाने नुकसान अधिकच गंभीर झाले आहे.” डॉ. सिंह पुढे म्हणाले की, “आपत्तीग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जात आहे. अन्न, औषधे, निवारा आणि तात्पुरती वीज व पाणीपुरवठा याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”
डॉ. जितेंद्र सिंह यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “आपत्तीच्या वेळी घाबरून जाऊ नये. प्रशासन आपल्या सोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल.” स्थानिक पातळीवर पोलिस, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी बचाव आणि पुनर्वसन कार्यात सहभागी झाले आहेत.
या दुर्घटनेमुळे केवळ जीवितहानीच नव्हे तर किंमती मालमत्ता, वाहने, शेतीसह हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर मला मृत्यू आला तर असाच हवा…’ गाझातील धाडसी फोटो पत्रकार फातिमा हसौनाची हृदयद्रावक कहाणी
रामबन जिल्ह्यातील या दुर्घटनेने पुन्हा एकदा हिमालयीन भागातील हवामानाच्या अनिश्चिततेचे गंभीर वास्तव समोर आणले आहे. प्रशासन, लष्कर आणि एनडीआरएफ पथके सतत कार्यरत आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतरच पूर्ण मदत आणि पुनर्वसन कार्याची गती वाढवली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.