राजगड शिवापट्टणवाडा स्थळांच्या उत्खननात सापडले वाड्याचे अवशेष; शिवकालीन शहराचे दर्शन ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
विजय जाधव । नवराष्ट्र मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वात अधिक काळ वास्तव्य असलेल्या वेल्हे तालुक्यातील हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथील शिवरायांच्या शिवापट्टण वाडा स्थळाच्या उत्खननात शिवकालीन बांधकामाचे अवशेष सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या शिवपट्टण या आधुनिक दर्जाच्या शिवकालीन शहराच्या चोहोबाजूंची अभेद तटबंदी (संरक्षण भिंत) उत्खननात उजेडात आली आहे. जवळपास १०० मीटरहून अधिक लांब व ५० मीटर रुंद अंतराच्या तटबंदीचा मूळ पाया उत्खननात सापडला आहे.
तसेच खोदकामात बहामणी काळातील एक नाणे, मोठ्या दगडांचा पाया, मातीच्या विटांचे बांधकाम, उखळ, जुन्या मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडले आहे. गेल्यावर्षी पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खननास सुरुवात केली. त्यावेळी राजवाडा व इतर वास्तूंचे अवशेष सापडले. त्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात 1410 ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष सापडले आहेत. शासनाने शिवपट्टण स्थळाच्या संवर्धनासाठी २२ कोटी रुपयांचा निधी पुरातत्व विभागाला दिला आहे. तटबंदीच्या मधोमध शिवपट्टणमध्ये राजवाड्यासह सैन्य, शिलेदार, बारा बलुतेदार, व्यापारी, शस्त्रसाठा, घोडदळ, पायदळ, बाजारपेठ आदी वास्तूंचे मूळ अवशेष उत्खननात यापूर्वीच सापडले आहेत.
हे देखील वाचा : मंगळावरील ‘सोन्याची खाण’! नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचा अद्भुत शोध; अब्जावधी वर्षे जुने खडक आणि सूक्ष्मजीवनाचे संकेत
मोहिमांच्या प्रसंगात उल्लेख १६४८ ते १६७३ असे तब्बल २५ वर्षे छत्रपती श्रीशिवरायांच्या राजपरिवारासह सर्वाधिक काळ राजगडावर वास्तव्य होते. तसेच हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाचा जगभर दरारा होता. शिवभारत, जेधे शकावली तसेच भारतीय व परकियांच्या कागदपत्रांत राजगडाच्या शिवपट्टण येथे श्री शिवाजी महाराज असल्याचे ऐतिहासिक नोंदी आहेत. प्रतापगड मोहीम, पन्हाळा, सुहगड मोहीम आदी मोहिमांच्या प्रसंगात शिवपट्टणचा उल्लेख आहे.
शिवपट्टण म्हणजे शहर आहे. त्यामुळे या स्थळाला महत्त्व आहे. दगड, विटा, चुन्यात शिवकालीन बांधकाम शैलीत असलेल्या शिवपट्टणची चोहोबाजूंची संपूर्ण तटबंदी उत्खननात सापडली आहे. त्यामुळे तटबंदीसह वाड्याच्या आतील भागात उत्खननात सापडलेल्या वास्तू स्थळांचे मूळ शैलीत संवर्धन करण्यात येणार आहे. बांधकामासाठी जुन्या शिवकालीन विटांची निर्मिती केली जात आहे. चुन्याचा वापर करून प्रवेशद्वार व इतर वास्तूंचे मूळ स्वरूपात उभारणी करण्यात येणार आहे. छत उभारून काही ठिकाणी पावसाळ्यातही काम करता येईल. – डॉ. विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग, पुणे.
हे देखील वाचा : 227 दिवसांनंतर ‘Soyuza cpsule’ प्रवाशांसह पृथ्वीवर परतले; नासाने केले अभिनंदन
शिवपट्टण लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे सत्ताकेंद्र उत्खननात सापडलेले शिवपट्टण शहर हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे सत्ता केंद्र आहे. अशा प्रकारचे देशातील हे अत्यंत महत्त्वाचे शिवकालीन स्थळ आहे. त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय, मानवकल्याणकारी कार्याचा जिवंत वारसा पुढे आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये शिवपट्टण संवर्धनाचे काम अडकून पडू नये, यासाठी पुरातत्व विभागाने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात शिवपट्टण वाड्याच्या चोहोबाजूच्या तटबंदीच्या अवशेषांच्या उत्खननास सुरुवात केली. कडक ऊन व अवकाळी पाऊस अशा अडचणींना तोंड देत १०० हून अधिक मजूर तसेच पुरातत्व विभागाचे प्रमुख अधिकारी उत्खननाचे काम करत आहेत.