आता १६ मेपासून होणार सीए परीक्षा (Photo Credit- Social Media)
मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने (आयसीएआय) पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर रात्री उशिरा याबाबत आयसीएआयने पत्रक काढले. आता या परीक्षा 16 मे ते 24 मे या कालावधीत होणार आहेत.
भारत-पाक या दोन देशांमधील तणावामुळे सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मूळ वेळापत्रकानुसार या परीक्षा 9 मे ते 14 मे या दरम्यान नियोजित होत्या. संपूर्ण देशभरात होणाऱ्या या परीक्षा काही भागांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या कारणामुळे काही शहरांमध्ये घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आयसीएआयने या परीक्षा स्थगित केल्या होत्या.
पूर्वीच्याच केंद्रांवर परीक्षा
शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान या देशांदरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर रात्री उशिरा आयसीएआयने याबाबतचे परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, आता 16 ते 24 मे दरम्यान या परीक्षा पूर्वीच्याच केंद्रांवर आणि पूर्वीच्याच वेळेनुसार होणार आहेत. परीक्षेच्या वेळा आणि केंद्रे आधीप्रमाणेच राहणार आहेत.
परीक्षांमध्ये बदल नाहीत
मे सत्रातील सीए फाऊंडेशन परीक्षांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील. मे सत्रासाठी सीए फाऊंडेशनच्या परीक्षा १५, १७, १९ आणि २१ मे रोजी नियोजित वेळेनुसारच होणार आहेत, अशी माहितीही संस्थेने दिली.
सुधारित परीक्षा वेळापत्रक
शुक्रवार, १६ मे – फायनल परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ – इंडायरेक्ट टॅक्स लों/इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) पेपर १ इंटरनॅशनल टॅक्स-ट्रान्सफर प्रायसिंग
रविवार, १८ मे – फायनल परीक्षा (ग्रुप दोन) पेपर ६- इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन्स/आयएनटीटी-एटी पेपर-२ – इंटरनॅशनल टॅक्स प्रॅक्टिस
मंगळवार, २० मे – इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ४ – कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग
गुरुवार, २२ मे – इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ५ – ऑडिटिंग अँड एथिक्स
शनिवार, २४ मे – इंटरमिजिएट परीक्षा (ग्रुप २) पेपर ६-फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट