दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान पदी शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी देखील एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाच्या 16 जागा तर नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाच्या 12 जागा आहेत. त्यांच्या साथीने देशामध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन केले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी येत्या 9 रोजी होणार असून सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावेळी देशातील अनेक मान्यवर तसेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
कोणा कोणाला आमंत्रण
येत्या रविवारी 9 जून रोजी राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्या आले आहे. राष्ट्रपती भवनात ८००० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, भुटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसनचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथही यांची देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर देशातील मान्य़वर उपस्थित राहणार आहेत. शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांची उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. तसेच पहिल्या वंद भारत महिला लोको पालयट सुरेखा यादव, वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.
यापूर्वी कोण राहिले होते उपस्थित
नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा शपथविधी सोहळा आहे. यापूर्वी 2014 साली नरेंद्र मोदी यांचा पहिला शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी सार्क (South Asian Association for Regional Cooperation) परिषदेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर 2019 साली झालेल्या दुसऱ्या शपथविधीवेळी बिमस्टेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) देशांच्या प्रतिनिधींनी शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यानंतर आता तिसरा सोहळ्याकडे संपूर्ण देशासह जगभराचे लक्ष लागले आहे.