
Subrata Roy : सहाराचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचे सांगितले आहे. FICCI कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच म्हणाल्या की सेबीसाठी, हे प्रकरण संस्थेबद्दल आहे आणि कोणीही जिवंत असो वा नसो तरीही तो खटला चालूच राहणार आहे. सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते.
काय आहे प्रकरण?
30 सप्टेंबर 2009 रोजी सहारा ग्रुपची कंपनी प्राइम सिटीने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता. DRHP विश्लेषणामध्ये, SEBI ला रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या निधी उभारणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या.
सेबीकडे सहाराविरोधात तक्रारी आल्या
25 डिसेंबर 2009 आणि जानेवारी 2010 रोजी सेबीला दोन्ही कंपन्या कर्ज रोख्यांद्वारे पैसे उभारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या कर्ज रोख्यातून कंपनी भांडवल उभारते आणि त्या बदल्यात कंपनी गुंतवणूकदाराला परिपक्वता होईपर्यंत व्याज देते.
लोकांकडून 24,000 कोटी रुपये उभे केले
कंपनीने रोख्यांद्वारे 2-2.5 कोटी लोकांकडून 24,000 कोटी रुपये उभे केल्याचे सेबीला समजले. सेबीने विचारले की सहाराने बाँड जारी करण्याची परवानगी का घेतली नाही? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि 2012 मध्ये, न्यायालयाने सहाराला गुंतवणूकदारांचे तपशील सेबीला देण्यास आणि 15% व्याजासह पैसे परत करण्यास सांगितले.
आजपर्यंत खटला सुरू आहे
2013 मध्ये, सहाराने कागदपत्रांनी भरलेले 127 ट्रक सेबीकडे पाठवले. त्यामुळे मुंबईच्या बाहेरील भागात वाहतूक कोंडी झाली होती. 28 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुब्रत रॉय यांना 24,400 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले होते. तेव्हापासून आजतागायत हे प्रकरण सुरू आहे.