तिरूपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरण (फोटो- टीम नवराष्ट्र)
Tirupati Laddu Controversy: भारतातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑईल असल्याचे सिद्ध झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये तूपाऐवजी प्राण्यांचा चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर प्रसादाचा नमुना हा तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. त्यामध्ये प्रसादात फिश ऑईल वापरले जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
तिरूपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये चरबी आढळल्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. आज यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना खडेबोल सुनावले आहेत. या प्रकरणाचा तपास आणि यावर निकाल येण्याआधीच माध्यमांमध्ये भाष्य करण्याची काय गरज होती? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे. किमान देवाला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी करताना सरकारला चांगलेच फैलावर घेतले. संविधानिक पदावर बसलेले व्यक्तीच अशीच विधाने करत असतील तर, मग तपास करण्याची काय गरज आहे? स्थापन करण्यात आलेल्या एसायटीने कुठपर्यंत तपास केला हे सरकारने स्पष्ट करावे. अहवाल जुलै महिन्यात आला तर मग यावर भाष्य सप्टेंबर महिन्यात का केले गेले? दरम्यान या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत केला जाणार की, दुसऱ्या एजन्सीला दिला जाणार याबाबत पुढील सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट आदेश देण्याची शक्यता आहे.
तिरूपती बालाजी मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आढळून आल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. याचिकाकर्त्याने राज्य सरकारला लक्ष्य करण्यासाठी ही याचिका दाखल केली असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. मी भक्त आहे, माझ्या भावना दुखावल्या आहेत. मी माझ्या भावनांचे संरक्षण करावे अशी मागणी करत आहे असे, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असे कोर्टात सांगितले.
भाविकांचा रोष अनावर
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित तिरुपती मंदिर बांधले आहे. हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. हे देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात दरदिवशी जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तासंतास रांगेत उभे राहिल्यानंतर तिरुपती बालाजीचे दर्शन मिळते. अशा या जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या देवस्थानामधील प्रसादामध्ये फिश ऑईल मिळाल्याने भाविकांचा रोष अनावर झाला आहे. सोशल मीडियावरही याबाबत भाविक आक्रमक झाले आहेत.