File Photo : NEET-UG 2024
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. नीट-यूजी परीक्षेतील अनियमितता आणि ती रद्द करण्याच्या मागणीशी संबंधित विविध याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात ही सुनावणी होईल. या खंडपीठात न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे.
खंडपीठाने नीट पेपर लीक प्रकरणाची चौकशी करणाऱ्या बिहार पोलिस आणि त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवालाची प्रत मागितली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, ते स्वतः हे दोन्ही अहवाल न्यायालयासमोर मांडतील. नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याचा खुलासा पाटणा पोलिसांनी परीक्षेच्या दिवशीच ५ मे रोजी केला होता. याप्रकरणी शहरातील शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर हे प्रकरण बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.
23 जून रोजी केंद्र सरकारने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली होती. या प्रकरणाची सुनावणी 22 जुलैपर्यंत पुढे ढकलताना सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) परीक्षा केंद्रनिहाय निकाल वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते.