आखाती संघर्षामुळे औषध साखळी कोलमडली; टीबी रुग्णांवर संकट (फोटो सौजन्य-ChatGPT)
राम खांदारे , मुंबई : जागतिक टीबी दिनाच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक बाब समोर आली असून, आखाती संघर्षामुळे जागतिक औषध पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारतातून होणाऱ्या टीबी औषधांच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होत असून, विशेषतः मध्य आशियातील देशांना औषधे पोहोचण्यात मोठा विलंब होत आहे.
भारत हा जगातील महत्त्वाचा ‘जनरिक औषधांचा पुरवठादार’ देश मानला जातो. कझाकस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांसारखे देश मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहेत. या देशांच्या टीबी नियंत्रण कार्यक्रमांसाठी लागणारी औषधे प्रामुख्याने भारतातूनच पुरवली जातात. मात्र, सध्या आखाती भागातील संघर्षामुळे एअर-कार्गो आणि शिपिंग मार्गांमध्ये बदल करावे लागत आहेत. परिणामी ट्रान्झिट वेळ वाढणे, फ्रेट खर्च वाढणे आणि पुरवठ्यात विलंब होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. औषधे भारतात उपलब्ध असली तरी ती वेळेत संबंधित देशांपर्यंत पोहोचत नसल्याने उपचारांमध्ये खंड पडण्याचा धोका वाढला आहे.
एमडीआर टीबी : बेडाक्वीलीन, डेलामनिड, मोक्सिफ्लॉक्सासीन, लिनेझोलिड
इतर : निश्चित मात्रेतील संयुक्त औषधे (एफडीसी), पीडियाट्रिक फॉर्म्युलेशन्स
“आखाती संघर्षाचा थेट परिणाम टीबी औषधांच्या निर्यातीवर झाला आहे. विशेषतः मध्य आशियातील देशांना जाणारा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. सध्या निर्यात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घटली आहे. ही समस्या ‘औषधांची कमतरता’ नसून ‘पुरवठा साखळीतील अडथळा’ आहे, अशी माहिती पीडबल्यूडीए सीईओ हिरेन शहा यांनी दिली.
“युद्धाचे परिणाम केवळ सीमांपुरते मर्यादित राहत नाहीत. ते आपल्या घरापासून रुग्णालयापर्यंत पोहोचतात. औषधांचा अखंड पुरवठा राखणे ही आजची सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्याची गरज आहे. सध्या औषधांची टंचाई नसली तरी भविष्यात उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया आयसीएमआर आणि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट टीबी अँड लन्ग डिसिज, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेंद्र तातू ननावरे यांनी दिली.






