संग्रहित फोटो
चंदीगड : पंजाबमधील खन्ना येथे धावत्या रेल्वेचे इंजिन वेगळे झाले. हे इंजिन सुमारे 3 किमी अंतर कापत दूरपर्यंत पोहोचले. यानंतर ट्रॅकवर काम करणाऱ्या ट्रॅकमॅनने अलार्म वाजवून लोको पायलटला याची माहिती दिली. यानंतर लोको पायलटने इंजिन थांबवून इंजिन पुन्हा रेल्वेशी जोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणाहून जम्मूतवीकडे जाणारी अर्चना एक्स्प्रेसचे इंजिन फतेहगड साहिबमधील सरहिंद जंक्शन येथे बदलण्यात आले. कर्मचाऱ्यांनी कोचला इंजिन नीट जोडले नाही. तरीही रेल्वे पुढे निघाली. यानंतर हे इंजिन खन्नामध्ये रेल्वेपासून वेगळे झाले. इंजिन खूप पुढे गेल्यानंतरही लोको पायलटला याची माहिती नव्हती. या गाडीत सुमारे दोन ते अडीच हजार प्रवासी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
सुदैवाची गोष्ट म्हणजे या वेळात दुसरी कोणतीही रेल्वे आली नाही. या प्रकाराने रेल्वे प्रवासी घाबरले. तीन किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या ट्रॅकमॅनने अलार्म वाजवला. त्यानंतर इंजिन थांबले.
ट्रॅकमनकडून आरडाओरडा; वायरलेसद्वारे संदेश
रेल्वेच्या गार्डने सांगितले की, इंजिन अचानक रेल्वेपासून वेगळे झाले. हे त्याने पाहिल्यावर वायरलेसद्वारे संदेश पाठवला. ट्रॅकमॅनने सांगितले की तो रेल्वे ट्रॅकवर काम करत होता. तेव्हा त्याने पाहिले की केवळ इंजिन येत आहे. तर रेल्वे सुमारे 3 किलोमीटर मागे उभी आहे. त्यानंतर त्याने आरडाओरडा केला. लोको पायलटलाने इंजिन थांबवले. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी इंजिन जोडून गाडी रवाना केली.