संग्रहित फोटो
कामथडी-भोंगवली गटातून विजयी झालेले विक्रम खुटवड यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. १९८२ नंतर भोर तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनंतर भोरचे स्वप्न पूर्ण होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना अध्यक्षपदाबाबत सकारात्मक संकेत दिल्याची चर्चा होती. मात्र, शिवतरे यांचा पराभव झाल्याने भोरची संधी पुन्हा हुकल्याचे मानले जात होते. त्याच वेळी खुटवड यांच्या विजयाने तालुक्याच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
चार दशकांहून अधिक काळ भोरला पदाने दिली हुलकावणी
भोर तालुक्यातून १९८२ साली सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) माधवराव टापरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर चार दशकांहून अधिक काळ भोरला या पदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे यंदा पक्षनेतृत्व अनुभव, निष्ठा आणि प्रादेशिक संतुलन या घटकांचा विचार करून भोरला संधी देणार का, याकडे लक्ष लागले आहे.
इतर तालुक्यांतील दावेदारही झाले सक्रीय
पुमे जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील दावेदारही सक्रीय झाले असून, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडेच राहणार आहे. मात्र, ४४ वर्षांची प्रतीक्षा आणि नव्या नेतृत्वाचा दावा या दोन मुद्द्यांमुळे भोरची बाजू यंदा अधिक ठळकपणे समोर येत आहे. अध्यक्षपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडते, यावर जिल्ह्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरणार आहे.






