File Photo : Champai Soren
रांची : झारखंडमध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर आता सत्तारूढ पक्षाला बहुमत चाचणीचे अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. यासाठी झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज सोमवार 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आले आहे.
बहुमत चाचणीसाठी सत्तारूढ पक्षाचे आमदार हैदराबाद येथून रांचीत दाखल होत आहेत. तर दुसरीकडे, पक्षातील नाराज आमदार हेंब्रम यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतल्यानंतर पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या निर्णयास त्यांनी विरोध केला होता.
हैदराबादेतून आमदार थेट विधानसभेत येणार
हैदराबाद येथून झामुमोचे आमदार सोमवारी सकाळी राचीत दाखल होत असून ते थेट विधानसभेत हजेरी लावणार आहेत. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपई सोरेन यांनी झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आमदार फुटण्याच्या भीतीने झामुमोच्या 35 आमदारांना तेलंगणात पाठविण्यात आले होते.