ऋषिकेश : ऋषिकेश म्हणजे वॅाटर स्पोर्ट्सच (water sports) नंदनवन समजलं जात. देशभरातले पर्यटक येथे फक्त फिरण्यासाठी नाही तर नदीतील वेगवेगळे खेळ अनुभवायला येतात. सध्या या परिसरातला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गंगेत रिव्हर राफ्टिंग (River Rafting) दरम्यान, दोन राफ्टमधील पर्यटक आणि राफ्ट गाईड यांच्यात तुफान भांडण झाल्याच पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. या व्हिडिओ पाहुन नेटकरी मात्र भन्नाट कमेंट करत आहेत.
कौडियाला-मुनीकिरेती या ठिकाणी दिल्लीहून आलेल्या एका पर्यटकांचा गृप नदीत रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी गेले होते. यावेळी राफ्टिंग करताना क्षुल्लक कारणावरुन पर्यटक आणि गाईडमध्ये भांडण झालं. त्यांनतर भांडण वाढत जाऊन एकच राडा झाला. यावेळी पर्यटक आणि राफ्ट गाईड हे नदीवर असताना एकमेकांना हातातील पॅडलने एकमेकांना मारत सुटले. बोटींवर काम करणाऱ्या एका व्यक्तीने एक व्हिडिओ काढला जो आता मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे.
गाईड आणि पर्यटकांमधील वादाचे खरे कारण गो प्रो कॅमेरा असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक या कॅमेऱ्याच्या माध्यमातून राफ्टिंगदरम्यान गंगेच्या लाटा आणि त्यातील साहसांचे चित्रीकरण करता येते. या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करण्यासाठी गाईड पर्यटकांकडून मनमानी पैसे घेतात, मात्र पर्यटन विभागाने राफ्टिंगदरम्यान हा कॅमेरा चालवण्यास बंदी घातली आहे. गो-प्रो कॅमेऱ्यांसह व्हिडिओ बनवण्यासाठी राफ्टिंग मार्गदर्शक अजूनही पर्यटकांशी व्यवहार करतात. जे पर्यटक शूटींग करण्यास नकार देतात, गाईड त्यांच्याशी गैरवर्तन करू लागतात आणि काही वेळा प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते, असे सांगितले जात आहे.
दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थानसह देशाच्या विविध भागातून पर्यटक येथे येतात. हे पर्यटक मरीन ड्राइव्ह, शिवपुरी, ब्रह्मपुरी आणि क्लब हाऊस येथून राफ्टिंग करतात. यासाठी ऑनलाइन तसेच ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. राफ्ट ऑपरेटर पर्यटकांना त्यांच्या वाहनातून राफ्टिंग पॉईंटवर घेऊन जातात. मार्च ते जून या काळात राफ्टिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होते. त्यामुळे पर्यटक आणि गाईडमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे.






