उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आम आदमी पक्षावर टीका (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: दिली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. तर 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक आगी जवळ येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. कॉँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
देशाच्या राजधानीला अराजकतेत ढकलल्याने पक्षाचे झाडू हे चिन्ह जप्त केले पाहिजे. योगी आदित्यनाथ यांनी मांगोलपुरी, विकासपुरी, राजेंद्र नगरमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. त्यांनी आपवर दिल्लीच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला. दिल्लीत रोहिंग्या आणि बांग्लादेशी यांना अक्षरे दिल्याचा आरोप त्यांनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “मला कधी कधी असे वाटते की, आम आदमी पक्षामध्ये औरंगजेबाचा आत्मा शिरला आहे का? कारण हे लोकांना पाण्यासाठी त्रास देत आहेत. उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने तीन कोटी घरांना पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा दिला. मात्र आप सरकारने टँकर माफियाना संरक्षण देऊन दिल्लीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून दूर ठेवले. आम आदमी पक्षाला एका-एका मतासाठी लढायला लावण्याची ही योग्य वेळ आहे. कारण यांनी तुम्हाला एक एक पाण्याच्या थेंबांसाठी त्रास दिला आहे.”
यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवालांना भोवणार?
दिल्लीत यमुनेच्या पाण्यावरून सुरू असलेलं राजकारण अरविंद केजरीवाल यांना भोवण्याची शक्यता आहे. यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता, त्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावून पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी कोणतेही ठोस पुरावे आणि उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अरविंद केजरीवाल यांना बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीत केजरीवालांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा: यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवालांना भोवणार?, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
सोमवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे. केजरीवाल यांच्या या विधानानंतर दिल्लीत यमुनेच्या पाण्याबाबत राजकीय वाकयुद्ध सुरूच आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला. दरम्यान, हरियाणाच्या नायब सैनी सरकारने हे आरोप फेटाळून लावले आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.