File Photo : Manipur violence
इम्फाळ : मणिपूरमधील हिंसाचाराची संपूर्ण देशभर चर्चा होती. त्यामुळेच मणिपूरच्या जिरिबाममध्ये शांतता राखण्यासाठी मैतेई आणि हमार समुदायांमध्ये एक करार झाला होता. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्थापित होईल, असे म्हटले जात होते. असे असतानाच या कराराच्या 24 तासांत जिरीबाममध्ये हिंसाचार उसळला आहे. येथे मेईतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या.
जिरीबाम येथील लालपाणी गावातील घरांना आग लावण्यात आली. मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैतेई आणि हमार समुदायांच्या प्रतिनिधींनी एकत्र काम करण्याचे मान्य केले होते.
आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता. या करारात दोन्ही बाजूची परिस्थिती सामान्य करण्यासाठी, जाळपोळ कमी करण्यासाठी, गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा निर्णय घेण्यात आला.
सुरक्षा दल तैनात
या करारानंतर 24 तासांच्या आत जिरीबामच्या लालपाणी गावात हिसाचार झाला. शुक्रवारी रात्री सशस्त्र लोकांनी गावातील एका घराला आग लावली. गावाला लक्ष्य करत गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत.
सीआरपीएफ तैनातीला आमदारांकडून विरोध
मणिपूरच्या 10 कुकी-जो आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जातीय हिंसाचाराने प्रभावित राज्यातील संवेदनशील भागात तैनात आसाम रायफल्सला कायम ठेवत सीआरपीएफसोबत बदलू नये यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.