महाकुंभदरम्यान प्रयागराजमधील गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य होते. (फोटो - istock)
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. या कुंभमेळादरम्यान कोट्यवधी भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. या पाण्यावरूनच चर्चा सुरु झाली आहे. त्यावर केंद्र सरकारने लोकसभेत माहिती दिली. ‘महाकुंभदरम्यान प्रयागराजमधील गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य होते. पाण्यातील पीएच, डीओ, बीओडी आणि एफसीची पातळी सामान्य होती’, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी एका उत्तरात दिली.
समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया आणि काँग्रेसचे खासदार के. सुधाकरन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सीपीसीबीच्या नव्या अहवालाचा उल्लेख केला. गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यातील पीएच, डीओ, बीओडी आणि एफसीची पातळी सामान्य होती. डीओ म्हणजे पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण. बीओडी म्हणजे घाण साफ करण्यासाठी पाण्यात किती ऑक्सिजन आवश्यक आहे. एफसी म्हणजे पाण्यात किती घाण आहे. पाण्याची गुणवत्ता तपासण्याच्या या सर्व पद्धती आहेत. त्यातून पाण्याची तपासणी करण्यात आली.
याआधी ३ फेब्रुवारी रोजी सीपीसीबीने एनजीटीला सांगितले होते की. प्रयागराजमधील अनेक ठिकाणचे पाणी आंघोळीसाठी योग्य नाही. पाण्यातील एफसीची पातळी जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. पण २८ फेब्रुवारीला सीपीसीबीने नवा अहवाल दिला. महाकुंभात आंघोळीसाठी पाणी ठीक असल्याचे सांगण्यात आले. हा अहवाल एनजीटीच्या वेबसाईटवर ७ मार्च रोजी टाकण्यात आला होता. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या दिवशी पाण्याच्या नमुन्यांमध्ये तफावत असल्याचे सीपीसीबीने म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी सांख्यिकीय विश्लेषण केले. यावरून हे पाणी आंघोळीसाठी योग्य असल्याचे दिसून आले.
गंगा-यमुनेच्या पाण्याची दोनदा चाचणी
सीपीसीबीने 12 जानेवारीपासून आठवड्यातून दोनदा गंगा आणि यमुनेच्या पाण्याची चाचणी केली. यामध्ये अमृतस्नानाच्या दिवसांचाही समावेश आहे. ‘NGT ने 23 डिसेंबर 2024 रोजी महाकुंभ दरम्यान गंगा आणि यमुनेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सीपीसीबीने संगम नाक्यासह सात ठिकाणी पाण्याची चाचणी केली.