'हे नरेंद्र मोदींचं सरकार, एक एक अतिरेक्यांला शोधून ठेचणार'; अमित शहांनी ठणकावलं
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “कोणी समजू नये की आमच्या २७ नागरिकांना मारून ही लढाई जिंकता येईल, प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे. कोणतंही भ्याड कृत्य माफ केलं जाणार नाही, एका एका अतिरेक्याला शोधून बदला घेतला जाईल, असं म्हणत अमित शहांनी अतिरेक्यांसह पाकिस्तानलाही ठणकावलं.
गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं की दहशतवादविरोधी लढाई ही भारताची दीर्घकालीन आणि न थांबणारी आहे. “नक्षलवाद असो की काश्मीरमधील उग्रवाद — भारत आता सहन करणार नाही. इंच-इंच जमिनीवरून दहशतवादाचा समूल नाश केला जाईल,” असं त्यांनी नमूद केलं. आज संपूर्ण जग भारतासोबत उभं आहे आणि जोपर्यंत दहशतवादाचा संपूर्ण नायनाट होत नाही, तोपर्यंत लढा चालू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सातत्याने कठोर निर्णय घेत आहे. बुधवारी भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपला हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी, २३ एप्रिल रोजी, हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली होती, ज्यात पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
भारताने अटारी सीमेवरील चेक पोस्ट बंद करून पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखले, अगदी वैध व्हिसा असतानाही. यासोबतच, भारताने पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी राजनैतिक नेत्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच, पाकिस्तानातील नागरिकांना भारताचा व्हिसा न देण्याचा कठोर निर्णयही घेण्यात आला.
याव्यतिरिक्त, पाकिस्तानसाठी असलेली SAARC व्हिसा सवलत योजना त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आली. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी मिळणार नाही. या बैठकीत भारताने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू नदी पाणी वाटप करार (Indus Water Treaty) तात्पुरता स्थगित करण्याचा. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.