Photo Credit- Social Media
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक गैरव्यवहार झाल्याचा आरोप गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षांकडून केला जात आहे. याबाबत अनेकदा विरोधीपक्षनेत्यांनी निवडणूक आयोगाकडेही चौकशी करण्याची मागणी केली. पण निवडणूक आयोगाकडून उत्तर न आल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली. पण त्यानंतरही आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीदेखील लोकसभेत महाराष्ट्र विधानसभा निडणुकीतील गैरकारभार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहूल गांधी म्हणाले, ‘पाच वर्षात म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या काळात 32 लाख नवे मतदार मतदार यादीत जोडले गेले. तथापि फक्त पाच महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 ते विधानसभा निवडणूक 2024 या काळात 39 लाख मतदार मतदार यादीत जोडले गेले. मग प्रश्न आहे, की महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीनंतर 39 लाख मतदार यादीत जोडले गेले आहेत. हे 39 लाख मतदार कोणते आहेत.एकट्या हिमाचल प्रदेशचे जेवढे मतदार आहेत तेवढे मतदार महाराष्ट्राच्या यादीत या पाच महिन्यात कसे जोडले गेले. असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच, केवळ पाच महिन्यात 39 लाख मतदार कसे आणि कुठून जोडले गेले याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणी लोकसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Arvind Sawant on OperationTiger: टायगर अभी जिंदा है….; अरविंद सावंतांनी स्पष्टचं सांगितलं
सुरूवातीला निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमणूकीतही बदल करण्यात आले. पूर्वी निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान यांचा समावेश होता. पण त्यात बदल करून सत्ताधारी पक्षाचे दोन नेते म्हणजे पंतप्रधान आणि आणखी एक व्यक्ती आणि विरोधी पक्षनेता असा बदल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेचच निवडणूक आयुक्तांची बदली करण्यात आली.
“महाराष्ट्र सरकारच्या मते, राज्यात 9.54 कोटी प्रौढ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या मते, महाराष्ट्रात 9.7 कोटी मतदार आहेत. म्हणजेच निवडणूक आयोगाच्या मते, महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत. हे कसे शक्य आहे?” कामठी विधानसभा जागेचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसला लोकसभेत 1.36 लाख आणि विधानसभेत 1.34 लाख मते मिळाली परंतु भाजपची मते 1.19 लाखांवरून 1.75 लाख झाली. याचा अर्थ नवीन मतदारांनी भाजपला मतदान केले. आम्हाला दोन्ही निवडणुकांसाठी मतदार यादीची माहिती हवी आहे. मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळण्यात आली आहेत, त्यापैकी बहुतेक दलित आहेत. निवडणूक आयोग प्रश्नांची उत्तरे देत नाही. निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्राची मतदार यादी मागितली. निवडणूक आयोग आम्हाला यादी का देत नाही, असा सवाल त्यांनी केला. मतदार यादीची संपूर्ण माहिती हवी आहे. यानंतर, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत राहुल म्हणाले की, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीतून सरन्यायाधीशांना काढून टाकण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली.