लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी कमी झाल्यामुळे संजय राऊत आक्रमक झाले (फोटो - नवराष्ट्र)
मुंबई : महायुती सरकारकडून निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना अल्पावधीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. तसेच निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील ती महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक ठरली होती. या योजनेंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपये दिले जात आहेत. निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र निवडणुकीनंतर या योजनेमधील अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेल्या किंवा निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यामुळे लाडक्या बहिणींवर अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. तसेच महिलांच्या घरी चारचाकी गाडी आहे का हे देखील अंगणवाडी सेविका घरी जाऊन तपासणी करणार आहेत. यामुळे लाभार्थी महिलांची संख्या एका महिन्यामध्ये पाच लाखांनी कमी झाली आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून गाळल्या जातील. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. दर महिन्याचे 1500 रुपये असे तीन महिने त्यांना पैसे पोहोचले आहेत. आता पैसे नाही. त्यामुळे त्यांना जेवढं ओझं कमी करता येईल, तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांकडून या योजनेवर कठोर भाष्य करण्यात आले आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांची एकत्रितपणे पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत माहिती देताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकीचे घोटाळे हे या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहे. पुराव्यासह ते हा घोटाळा मांडणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाडक्या बहीणींची संख्या झाली कमी
गेल्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या योजनेतील तब्बल 5 लाखांनी लाभार्थी घटले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. मात्र जानेवारी 2025 मध्ये लाभार्थी महिलांचा आकडा 2.41 कोटीवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.