मोदींची सभा सुरू असताना मुलगी अचानक चढली खांबावर; पोलीस प्रशासनात एकच खळबळ

तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसभेत चक्रावून टाकणारा प्रकार घडला.

    हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसभेत चक्रावून टाकणारा प्रकार घडला. तेलंगणात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यानिमित्त मोदी जनसभेला संबोधित करत असताना एक मुलगी सभेसाठी लावण्यात आलेल्या लाईटच्या खांबावर चढली. त्यानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी मुलीला खाली उतरण्यास सांगितलं. तिची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर मुलगी खाली उतरली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    तेलंगणात ३० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. दिग्गज नेत्यांच्या रॅली आणि सभा सुरू आहेत. पंतप्रधान मोदी काल तेलंगणात होते. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधत त्यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. सिकंदराबादमधील त्यांच्या सभेला हजारोंची उपस्थिती होती.मोदींची सभा सुरू असताना एक मुलगी खांब्यावर चढली. त्यामुळे सुरक्षारक्षकांचा गोंधळ उडाला.

    सगळ्यांनीच तिला खाली उतरण्याचा आग्रह धरला, विनवण्या केल्या. यानंतर मोदींनी तिला खाली उतरण्याची विनंती केली. ‘मुली तू खाली ये. हे ठीक नाही. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू खाली ये बेटा. तिथली तार ठीक नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतो,’ अशा शब्दांत मोदींनी मुलीला खाली उतरण्यासाठी विनंती केली.

    मोदींच्या विनवणीनंतर मुलगी खाली उतरली. मोदींनी तिचे आभार मानले. पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना त्यांच्या शेजारी एमआरपीएसचे संस्थापक कृष्णा मडिगा बसले होते. मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून ते रडू लागले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून मोदींनी त्यांचं सांत्वन केलं.