सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. लॉरेन्स बिश्णोई टोळीचा कुख्यात फरार सदस्य शुभम लोणकर हा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. अलीकडेच, काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना लोणकरकडून सलग सहावी धमकी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने आमदाराची सुरक्षा ‘वाय-प्लस’ पर्यंत वाढवली आहे. विधानसभेतील या गदारोळाने गुन्हेगारी जगताचा एक नवीन चेहरा पुन्हा समोर आणला आहे.
पुण्यातील एका डेअरीमधून चालविले नेटवर्क
परदेशातून परतल्यानंतर, लोणकरने आपला भाऊ प्रवीणसोबत पुण्यात एक डेअरी दुकान चालवायला सुरुवात केली. या दुकानाच्या नावाखाली त्याने व्यावसायिक, राजकारणी आणि चित्रपट कलाकारांचे एक मोठे जाळे तयार केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, १९९० च्या दशकात अंडरवर्ल्डच्या ऱ्हासानंतर मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडवर राज्य करणे हे लोणकरचे ध्येय होते. लोणकरने माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्याकांडातील शूटर शिवकुमार गौतमला ‘धर्म’ आणि ‘राष्ट्रवाद’ या नावाखाली चिथावले होते.
सैन्याच्या इच्छेपासून ते गुन्हेगारीपर्यंत गाठली मजल
शुभम लोणकरला एकेकाळी देशाची सेवा करण्यासाठी भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते. २०१८-१९ मध्ये जैसलमेर येथे सैन्य भरती परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर, तो ‘बजरा’ नावाच्या एका व्यक्तीला भेटला. देशभक्तीच्या नावाखाली लोणकरचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आणि तो बिश्णोई टोळीत सामील झाला. टोळीने त्याला औपचारिक शस्त्र प्रशिक्षणासाठी नेपाळ आणि अझरबैजानला पाठवले.
हे सुद्धा वाचा : अंबड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर
आरोपीचे प्रत्यार्पण अवघड
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण, बाबा सिद्दिकी हत्याकांड आणि रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर नेपाळमार्गे भारतातून पळून गेला असून, सध्या आग्नेय आशियाई देशांमध्ये लपून बसला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, तो अशा देशात आहे, ज्याच्यासोबत भारताचा प्रत्यार्पण करार नाही. सध्या, केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने, त्याला भारतात परत आणण्याचे आणि त्याचा साथीदार अर्जु बिश्णोई याचे जागतिक जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.






