26 वर्षीय तरुण कॉंग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची हरयाणाच्या रोहतकमध्ये हत्या करण्यात आली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
हरयाणा : काँग्रेस महिला नेत्या हिमानी नरवाल यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार हरियाणातल्या रोहतकमध्ये घटना असून यामुळे हरियाणासह देशभरामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रोहतकमधील सांपला बस स्टँडजवळ एका सुटकेसमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्यात निवडणुका होत असताना ही घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. हिमानी नरवाल यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला होता.
कोण होत्या हिमानी नरवाल?
काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल सोनीपतमधील कथुरा गावातील रहिवासी होत्या. त्या रोहतक ग्रामीण युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षाही होत्या. त्यांची गणना काँग्रेसचे एक धाडसी, जागरूक आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून केली जात असे. भारत जोडो यात्रा असो किंवा काँग्रेसची इतर कोणतीही मोहीम असो, हिमानी यांनी प्रत्येक जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. त्यांनी शिक्षणामध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे रोहतकमध्ये भाड्याचे घर होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हिमानी नरवाल यांनी अनेकदा रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या कार्यक्रमांमध्ये हिरहिरने सहभाग घेतला आहे. त्या काँग्रेसच्या रॅली आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये हरियाणवी लोककलाकारांसोबत सादरीकरण करण्यासाठी देखील ओळखल्या जात होत्या. त्यांच्या तरुण नेतृत्वाने अनेकांना प्रभावित केले होते.
भूपेंद्र हुड्डा यांनी व्यक्त केला शोक
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी हिमानीच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रोहतकमध्ये सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या निर्घृण हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. अशा प्रकारे एका मुलीची हत्या आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडणे हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. हुड्डा यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ही घटना स्वतःच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरील कलंक आहे. या हत्येची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि सरकारने पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमके घडले काय?
हरियाणातल्या रोहतक या ठिकाणी शनिवारी सकाळी 11 च्या दरम्यान बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक एकाजागी सुटकेस पडलेली असल्याचे दिसून आले. या निळ्या रंगाच्या सुटकेसकडे प्रवाशांचे लक्ष गेले. ही सुटकेस रस्त्याच्या कडेला अशीच ठेवण्यात आली होती. बेवारस बॅग ठेवली असल्यामुळे लोकांना संशय आला. लोकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पोलीस आले आणि त्यांनी ही सूटकेस उघडली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. या सूटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. हातावर मेहंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढरा टॉप आणि लाल रंगाची पँट. या युवतीचा मृतदेह पाहून असं वाटत होतं की गळा दाबून तिला ठार करण्यात आलं आहे त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून फेकला आहे. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला बोलवलं. शनिवारी दुपारपर्यंत ही तरुणीची ओळख पटली नव्हती. मात्र नंतर हा मृतदेह काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा असल्याची माहिती समोर आली.