नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Former PM Jawaharlal Nehru) यांचा उल्लेख करत नेहरू-गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी वर्तमानपत्रात वाचले होते की सुमारे 600 योजनांना गांधी-नेहरूंची नावे आहेत. मला समजत नाही की त्यांच्या पिढीतील व्यक्ती नेहरू आडनाव ठेवण्यास का घाबरतात?’ यात लाज कशाची आहे?’, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
संसदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘तुम्ही एवढी मोठी व्यक्ती असाल तर लाज कशाची? आणि तुम्ही आमचा हिशेब मागा. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे राहुल गांधींचे पणजोबा होते. पण राहुल गांधींसह कुटुंबातील इतर सदस्यांचे आडनाव गांधी कसे झाले? नेहरू घराण्याच्या गांधी आडनाव धारण करण्याचा इतिहास काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो’.
नेहरू कुटुंबात गांधी आडनाव कसे आले?
‘गांधी’ हे आडनाव फिरोज जहांगीर गांधी (इंदिरा गांधींचे पती आणि राहुल गांधींचे आजोबा) यांच्यावरून आले. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्यानंतर आपल्या आडनावाचे स्पेलिंग बदलले. त्यांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंध नव्हता. जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा नेहरू यांनी 1942 मध्ये फिरोज गांधी यांच्याशी लग्न केला आणि त्यामुळे त्यांचे नाव इंदिरा गांधी झाले.
इंदिराजींचे फिरोज गांधींशी लग्न
जवाहरलाल नेहरूंनी वडिलांचा वारसा पुढे नेला. त्यांची मुलगी इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू (नंतर इंदिरा गांधी) होती. इंदिरा यांचा विवाह फिरोज जहांगीर गांधी यांच्याशी झाला आणि त्यांचे नाव इंदिरा गांधी झाले. इंदिरा गांधींना राजीव गांधी आणि संजय गांधी अशी दोन मुले होती.