मान्सून दोन आठवडे आधीच कसा दाखल झाला? काय आहेत कारणं? वाचा सविस्तर
मान्सूनने केवळ केरळच नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रापर्यंत मोठा भाग व्यापला. २६ मे रोजी मान्सून निम्म्या भारतात दाखलं होणं ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. साधारणतः १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो, मात्र यंदा तो तब्बल दोन आठवडे आधीच दाखल झाला. इतक्या मोठ्या प्रदेशात एकाचवेळी मान्सून पोहोचने ही घटना तब्बल ५४ वर्षांनंतर, म्हणजे १९७१ नंतर प्रथमच घडली आहे. हवामान विभालाही यंदा हुलकावणी दिली आहे. दरम्यान यामागे नक्की ग्लोबल वॉर्मिंग हे कारण आहे की कोणती भौगोलिक घटना? जाणून घेऊया या रिपोर्टमधून…
Mumbai Rain : “पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे…; मुंबईची तुंबई झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
मान्सूनचं आगमन आणि त्याची प्रगती अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांवर अवलंबून असते. यंदाही त्याचा प्रभाव राहिला आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे
हवामान
मॅडेन-जूलियन ऑसिलेशन (MJO)
MJO हा ३०-६० दिवसांचा हवामान चक्र आहे जो पर्जन्यमानावर प्रभाव टाकतो. यंदा मे २०२५ मध्ये MJO टप्पा-३ व नंतर टप्पा-४ मध्ये होता, ज्यामुळे ढगांची निर्मिती व नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यास मदत होते.
ENSO स्थिती (एल निनो/ला नीना)
२०२५ मध्ये ENSO स्थिती ‘न्यूट्रल’ होती, म्हणजेच एल निनो किंवा ला नीना यांचा प्रभाव नव्हता. ही स्थिरता मान्सूनसाठी पोषक ठरली आहे.
इंडियन ओशन डायपोल (IOD)
IOD देखील ‘न्यूट्रल’ स्थितीत होता, पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सौम्य ‘पॉझिटिव्ह IOD’ निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा पुढील मान्सूनच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
२. मानवनिर्मित हवामान बदल
ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमवर्षावात घट
युरेशिया व हिमालयात जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान सरासरीपेक्षा १५ टक्के कमी हिमवर्षाव झाला. यामुळे जमिनीचा एल्बेडो (परावर्तकता) कमी झाला आणि पृष्ठभाग गरम झाला, ज्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना गती मिळाली.
वातावरणातील वाढलेली आर्द्रता
ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढल्याने वातावरणात ६-८ टक्के जास्त आर्द्रता राहते. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात मे महिन्यात ही आर्द्रता वाढल्याने ढग निर्माण होतात आणि पावसाला मदत झाली.
मजबूत सोमाली जेट
अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे वाहणाऱ्या ‘सोमाली जेट’ या कमी उंचीच्या वाऱ्यांचा प्रवाह यंदा खूप मजबूत होता. त्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रात आर्द्रता वाढून मान्सून लवकर पोहोचला.
यंदाची घटना कितपत असामान्य?
१९७१ नंतर प्रथमच असा मोठा भूभाग (केरळ ते महाराष्ट्र) एकाच दिवशी मान्सूनच्या प्रभावाखाली आला आहे. ही घटना दुर्मीळ असली तरी पूर्णतः असामान्य नाही. मात्र, यंदा हवामानातील बदल व मानवनिर्मित घटकांचा मोठा परिणाम झाला आहे.
Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद
मान्सूनची गती मंदावू शकतो का?
भारतीय हवामान विभागानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्य अक्षांशातील (मिड-लॅटिट्यूड) कोरड्या हवेचा प्रवेश होऊ शकतो. हे वारे मान्सूनसाठी पोषक असलेल्या आर्द्रतेला आडथळे आणू शकतात. यामुळे मान्सूनची पुढील प्रगती मंदावण्याची होण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये चक्रवात ‘रेमल’ मुळे बंगालच्या उपसागरातील मान्सून १९ दिवस रेंगाळला होता.
MJO चा प्रभाव, न्यूट्रल ENSO आणि मजबूत सोमाली जेट हे यंदा मान्सूनच्या लवकर आगमनाचे मुख्य घटक होते. युरेशियन हिमवर्षावातील घट सुमारे ३३% मान्सूनवर सकारात्मक परिणाम करते, परंतु हा संबंध प्रत्येक वर्षी सारखा असेलच असं नाही. दरम्यान ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेला हवामान बदल आणि समुद्री वाऱ्यांच्या प्रवाहाने ही दुर्मिळ भौगोलिक घटना घडली आहे. यामुळे मान्सूनचा अभ्यास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे आणि हवामान बदलाचा प्रत्यक्ष परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे.