विमान का पाडलं गेलं, यापेक्षा महत्त्वाचं आहे का आणि कसं पडलं"? CDSअनिल चौहानांची अप्रत्यक्ष कबूली
CDS Anil Chouhan News: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत मोठा लष्करी संघर्षही झाला. या संघर्षात पाकिस्तानसह भारतीय लष्कराचेही नुकसान झाले का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या सगळ्यात मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षाच्या दरम्यान भारताच्या लढाऊ विमानांना झालेल्या नुकसानीबाबत विचारलेल्या प्रश्नांना भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल चौहान म्हणाले, “विमान पाडण्यात आली ही बाब गौण आहे, ती का पाडण्यात आली हे अधिक महत्त्वाचे आहे.” चौहान यांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या सहा विमानांच्या नुकसानाच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळले, मात्र लढाऊ विमानांच्या संख्येबाबत कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. सीडीएस अनिल चौहान सध्या सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या शांग्री-ला संवादात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. तिथेच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान म्हणाले, “हे महत्त्वाचं नाही की जेट पाडलं गेलं, महत्त्वाचं हे आहे की ते का पाडलं गेलं. या न्युज चॅनेलने या मुलाखतीचा एक मिनिट पाच सेकंदांचा भाग आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. “पाकिस्तानने भारताची एकापेक्षा जास्त लढाऊ विमानं पाडली आहेत, असा पाकिस्तानकडून दावा कऱण्यात आला आहे, याबाबत आपण काही सांगू शकता का?
यावर चौहान उत्तर देताना म्हणाले की ” चांगली गोष्ट ही आहे की आम्ही आमच्या टॅक्टिकल चुका ओळखल्या, त्या सुधारल्या आणि दोन दिवसांत त्या सुधारणा अंमलात आणल्या. त्यानंतर आम्ही सर्व जेट पुन्हा उडवले आणि लांबच्या लक्ष्यांवर निशाणा साधला.” त्यानंतर “पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी भारताची सहा लढाऊ विमाने पाडली, तो कितपत योग्य आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सीडीएस चौहान स्पष्टपणे म्हणाले की, “हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. पण जसे मी सांगितलं, संख्या महत्त्वाची नाही, महत्त्वाचं हे आहे की विमाने का पाडली गेली आणि त्यानंतर आम्ही काय केलं. हेच आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.”
काळजी घ्या ! देशभरात कोरोनाचा वाढतोय धोका; गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू तर रुग्णसंख्या पोहोचली…
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात प्रतिहल्ला केल्याचा दावा करण्यात आला. याच दिवशी, म्हणजे 7 मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत बोलताना असा दावा केला की, त्यांनी भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असून त्यामध्ये भारताची 5 लढाऊ विमाने पाडण्यात आली. त्यांनी असा आरोपही केला की या 5 विमानांपैकी 3 विमाने राफेल होती.
यानंतर पाकिस्तानकडून आपला दावा आणखी वाढवण्यात आला. पुढे त्यांनी 6 भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करत अधिक तीव्र प्रतिक्रिया दिली. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानच्या या दाव्यांना सातत्याने फेटाळण्यात आले असून, लढाऊ विमानांच्या नुकसानीसंदर्भातील खात्रीशीर माहिती अजूनपर्यंत अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.