नवी दिल्ली – पती व पत्नीने एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे मानसिक क्रौर्य असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा मद्रास हाय कोर्टाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. न्यायालयाने या प्रकरणी संशयामुळे पतीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घालणाऱ्या पत्नीचा घटस्फोट मंजूर केला.
न्यायमूर्ती व्ही.एम. वेलुमणी व न्यायमूर्ती एस. सौंथर यांच्या खंडपीठाने शिवकुमार यांची घटस्फोटाची याचिका मान्य केली. कोर्ट म्हणाले – पत्नी श्रीविद्याला पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे सीन क्रिएट करण्यासाठी ती त्याच्या कार्यालयात गेली होती. श्रीविद्याकडे या प्रकरणी कोणतेही पुरावे नव्हते. त्यानंतरही तिने यासंबंधी शिवकुमार यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली. हे सर्व मानसिक क्रूरतेच्या श्रेणीत येते.
कोर्ट म्हणाले की, श्रीविद्या, पतीची फेरतपासणी घेण्यासाठी त्याच्या महाविद्यालयात गेली. तिथे तिने विद्यार्थीनी व महिला कर्मचाऱ्यांसोबत शिवकुमार यांचे अवैध संबंध असल्याचा आरोप केला. श्रीविद्याचे हे कृत्य हिंदू विवाह कायदा कलम 13(1)(ia) अंतर्गत मानसिक क्रूरतेच्या कक्षेत येते. असे करुन तिने आपल्या पतीची प्रतिमा मलिन केली. ती आता पुन्हा दुरुस्त करता येणार नाही.
शिवकुमार यांनी या प्रकरणी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयाकडे धाव घेतली होती. पण कोर्टाने क्रूरतेच्या त्यांची याचिका धूडकावून लावली. याविरोधात त्यांनी मद्रास हाय कोर्टात दाद मागितली होती.