एकीकडे उत्तर भारतात थंडीची लाट सुरु असतानाच दुसरीकडे मात्र पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढला आहे. धुक्यामुळे दुष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने देशातील विविध ठिकाणी थंडीचा देखील इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरत आहेत. मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाण्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईमध्ये 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
विदर्भात येत्या काही दिवसात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






