प्रतिकात्मक फोटो
शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरुर येथील किराणा मालाच्या दुकानाचा (Grocery Shop) पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम तसेच सिगारेट चोरून नेल्याची घटना घडली असून, शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर येथील गजानन मंगल कार्यालयच्या शेजारी वैभव भुजबळ याचे व्ही. ए. मार्ट नावाने किराणा दुकान असून, २१ सप्टेंबरला भुजबळ हे दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी ते दुकानात आले असताना त्यांना दुकानाचे पत्रे उचकटले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी दुकानाची तसेच दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केल्याचे दिसले.
तसेच दुकानातील काही रोख रक्कम व सिगारेट चोरून नेल्याचे समोर आले. याबाबत वैभव लालचंद भुजबळ (वय २४, रा. करंजेनगर, शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र बनकर हे करत आहे.






