गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री क्रांती रेडकर आता तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अभिनयापासून सुरू झालेली तिची सिनेसृष्ट्रीतील कारकिर्द आता दिग्दर्शनाच्या वळणावर आली आहे. लवकरच ती आता ‘रेनबो’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रांती ‘रेनबो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या आधी क्रांतीने ‘काकण’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.
‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ अंतर्गत तयार होणारा ‘रेनबो’ (Rainbow) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, उर्मिला कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि ऋषी सक्सेना ही मंडळी आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमधील बदलत जाणारी कलरफूल जर्नी प्रेक्षकांना ‘रेनबो’मधून अनुभवता येणार आहे. याबद्दल तिने सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली.
रेनबो चित्रपटाबद्दल क्रांती सांगते, ‘काकण’ चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, त्यामुळे मला एक उत्तम कथा असलेला चित्रपट बनवायचा होता. आधी मी चित्रपटाची कथा लिहिली आणि मग मला साजेसे कलाकार मिळाले. हे सर्व माझे चांगले मित्र आहेत आणि ते खूप चांगले अभिनेतेही आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.”