फोटो - सोशल मीडिया
पुणे : आज भाजपने पुण्यामध्ये विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. यानिमित्ताने भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह यांनी पुण्यामध्ये उपस्थिती लावली. भाजपच्या महाअधिवेशनामध्ये आगामी निवडणूकीच्या दृष्टीने चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपने विरोधकांवर देखील तुफान राजकीय टोलेबाजी केली. महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत टीकास्त्र डागले. यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील टीका केली. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला.
काय म्हणाले आमदार सुधीर मुनगंटीवार?
आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. हा अतिशय पवित्र असा दिवस आहे. यानिमित्ताने अमित भाईंकडून आज एक वैचारिक ऊर्जा घेण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत भामरागड पासून रायगडापर्यंतचे सर्व भाजप कार्यकर्ते आले आहेत. या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीची शिकवणूक आहे ती ऊर्जा ते मार्गदर्शन या बैठकीमध्ये होणार आहे. फक्त विधानसभेची निवडणूक हा काही आमचा अजेंडा असू शकत नाही. आघाडी करताना यांच्यापासून हा विचार पोहोचवण्याचा दृष्टीने संकल्प करण्यासाठी आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी हजारो कार्यकर्ते आले आहेत. आम्हाला विश्वास आहे, की ते वैचारिक ऊर्जा घेऊन जातील. काँग्रेस जो वैचारिक अंधार, जातीपातीचा अंधार निर्माण करत आहे. ही वैचारिक ऊर्जेच्या या प्रकाशात हा अंधार दूर करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सच्चा कार्यकरता करेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
उमेदवार आम्ही पाडू या पवित्र वाक्याची वाट पाहत आहोत
पुढे त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उगारलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे उमेदवार पाडत नाहीत. आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय ते कधीतरी म्हणतील शरद पवारांचे उमेदवार मी पाडील. आम्ही त्या वाक्याची वाट पाहतोय. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. महाविकास आघाडीने बैठकीवर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीचा कोणताही नेता जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी करत नाही. अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. भाजपचा सुपडा साफ करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. पण त्याचा फायदा मराठा बांधवांना होणार आहे का? त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल जे पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. कारण शरद पवार म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही. आता आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही पाडू या पवित्र वाक्याची वाट पाहत आहोत, असे स्पष्ट मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.