कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे मागील ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या राष्ट्रीकृत सिंडीकेट (आत्ताची कॅनरा) बॅंकेत मागील एक महिन्यांपासून अधिकारीच नसल्याने बँकेच्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. याबाबत स्थानिक प्रतिनिधींनी कॅनरा बँकेचे डिव्हिजनल मॅनेजर चंदनकुमार यांचेशी येथे शाखा अधिकारी नियुक्त करावेत म्हणून सातत्याने पाठपुरावा व संपर्क साधल्यानंतर ५ च दिवसांत कवठे शाखेत आज दि. ०५ ला शाखाधिकारी नियुक्त झाल्याने परिसरातील नागरिकांची बँकेशी निगडीत असलेली कामे आता मार्गी लागतील असा विश्वास ग्राहकांमधून व्यक्त होत आहे. या बाबत ‘दैनिक नवराष्ट्र’ने दिलेल्या सविस्तर वृत्ताची तात्काळ दखल घेण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
मागील एक महिन्यांपूर्वी या शाखेतील व्यवस्थापक,उपव्यव्यवस्थापक,शेतकी अधिकारी यांची इतरत्र बदली झाली असताना अधिकाऱ्यांअभावी ग्राहकांचे बँकेशी निगडीत कर्जप्रकरणे,लेणदेन,नवीन खाते उघडणे,दाखले व इतर सेवा मिळण्यासाठी अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. ही बाब कॅनरा बँकेचे डिव्हिजनल मॅनेजर चंदनकुमार यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आज सोमवारी तात्काळ या शाखेत शाखाधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर लवकरच या शाखेत कायमस्वरूपी शाखाधिकारी,शेतकी अधिकारी नियुक्ती बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरूच असल्याचे चंदनकुमार यांनी सांगितले.