Delhi Blast Update: Tight security in UP after Red Fort blast (photo- social media)
Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याच्या स्फोटानंतर यूपीमध्ये कडक सुरक्षा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. धार्मिक शहरी भागात दक्षता वाढवण्यात आली असून अयोध्या, काशी (वाराणसी) आणि मथुरा या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली आहे. रामजन्मभूमी परिसर, काशी विश्वनाथ धाम आणि कृष्णजन्मभूमी मंदिर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
एसएसपी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी अयोध्येत पाहणी केली असून पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. वाराणसीमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जात आहे, जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ शोधता येईल. मथुरेतील यमुना एक्स्प्रेस वेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर विशेष पाळत ठेवली जात आहे. सर्व्हिलन्स टीम आणि इंटेलिजन्स युनिटलाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : Delhi Blast हा आत्मघाती हल्लाच; CCTV फुटेज समोर, स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये दहशतवादी उमर?
मेरठ, गाझियाबाद, नोएडा आणि सहारनपूरमध्ये पोलिसांनी रेड अलर्ट मोड जारी केला आहे. दिल्लीच्या सीमेवर नाकेबंदी लागू करण्यात आली असून प्रत्येक वाहनाची तपासणी करून प्रवाशांचे ओळखपत्र आणि मोबाईल लोकेशनही तपासले जात आहे. मेरठमध्ये पोलिसांनी सर्किट हाऊस ते क्लॉक टॉवरपर्यंत गस्त वाढवली आहे. त्याच वेळी, नोएडामध्ये सीसीटीव्ही फुटेजचे पुनरावलोकन केले जात आहे आणि मॉल्स, मेट्रो स्टेशन आणि कॉर्पोरेट हब सेक्टर-62 मध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.
दिल्ली स्फोटानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीची बैठक बोलावून गृह विभाग आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दक्षता, तपास आणि जनसंपर्क ठेवत सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवाची तात्काळ त्याचा तपास करून कारवाई करावी. ड्रोन, सीसीटीव्ही आणि तांत्रिक पाळत ठेवणारी यंत्रणा यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
हेही वाचा : Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती
कोणतीही संशयित व्यक्ती, वस्तू किंवा क्रियाकलाप आढळल्यास तात्काळ 112 क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस चौकीवर कळवावे अशा सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक मेसेज आणि जुने फोटो व्हायरल होऊ नये म्हणून सायबर सेल सगळ्यांवर कडक नजर ठेवणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी पोलिसांसह एटीएस (अँटी टेरर स्क्वाड) आणि आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) देखील सक्रिय झाले आहेत. बलिया, गोरखपूर, बहराइच, सोनभद्र, मिर्झापूर आणि मऊ या सीमावर्ती जिल्ह्यांतील गुप्तचर यंत्रणांना माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लखनौ, कानपूर, गोरखपूर, वाराणसी, आग्रा आणि झाशी या राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर साध्या वेशातील शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि GRP यांनी ट्रेनमध्ये सखोल तपासणी मोहीम सुरू केली आहे.






