मुंबई : मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.
काय म्हणाले नेमकं फडणवीस ?
“सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार करायला हवा. ५० टक्क्यांवरचं आरक्षण राज्याने दिलं होतं. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल?” असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
[read_also content=”गेल्या दिड वर्षापासून खात्याला पूर्णवेळ प्रधान सचिव नसणे हेच जलसंपदामधील खदखद असण्याचे मुख्य कारण?; सूत्रांची माहिती https://www.navarashtra.com/latest-news/the-fact-that-the-department-has-not-had-a-full-time-principal-secretary-for-the-last-one-and-a-half-years-is-the-main-reason-for-the-crisis-in-water-resources-information-from-reliable-sources-nrd-128804.html”]
राज्य सरकारची नौटंकीबाजी
“आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. मी केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं केंद्रानं ही भूमिका मांडली. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलं आहे. तुम्हाला माहिती नाही का की गव्हर्नरच्या हातात काही नाही. एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं असेल, तर इंदिरा साहानींचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने याही प्रकरणात गृहित धरला आहे”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.