टेंभुर्णी : टेंभुर्णी (ता. माढा) येथील शितल नगरमधील एका घरावर छापा टाकून तब्बल ६४ लाख ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. राहुरी व टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई रविवारी (२९ जून) रोजी करण्यात आली. पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (रा. अर्जुननगर, ता. करमाळा, जि. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौगुले (रा. कर्जत, जि. अहमदनगर), आणि तात्या विश्वनाथ हजारे (रा. पाटेगाव, ता. कर्जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
राहुरी (ता. अहमदनगर) येथे हे तिघे बनावट दोन लाख रुपयांच्या नोटा केवळ एक लाख रुपयांना विकण्याचा व्यवहार करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बनावट नोटा टेंभुर्णीतील घरात छापल्याची कबुली दिली.त्यानुसार, टेंभुर्णीतील शितल नगर येथील प्रतीक पवार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेथे २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल, नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर, शाई, मशीन, कागदपत्रे असे सुमारे ३ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि संदीप मुरकुटे, तसेच सरडे, परांडे, वाघमारे, झोळ, धोत्रे यांचा सहभाग होता. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.