सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोना प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर सभागृहात गर्दी जमविल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami), संयोजक प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सभापती सदस्य यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
मंगळवारी झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ऑनलाईन पुरस्कार सोहळयाच्या नावाखाली बेकायदेशीर गर्दी जमवून कार्यक्रम पार पाडला गेला. झेडपीची सर्वसाधारण सभा खुल्या सभागृहात घेण्याची सदस्यांची मागणी असताना जाणीवपूर्वक मागणी फेटाळण्यात येते आणि प्रशासनाच्या ‘चमको’ कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यात येऊन पाठ थोपटून घेत आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्याचा नियम आणि सदस्यांच्या सभेला कोरोना प्रतिबंध नियम हा भेदभाव कशासाठी? असा संतप्त सवाल कृषी सभापती अनिल मोटे, सदस्य सुभाष माने यांनी केला.
पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या दोनशे मुख्याध्यापक शिक्षकांना तात्काळ १ महिन्यासाठी क्वारंटाईन करण्यात यावे. अन्यथा ते शिक्षक शाळेत जाऊन कोरोना संसर्ग पसरविण्याची शक्यता आहे. प्रशासन सदस्यांसोबत दुजाभाव करीत आहे. ऑफलाईन सभा घेऊन समन्वय राखण्यात यावे, असे सदस्य अतुल खरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, महिला सदस्यांनी प्रशासनाच्या एकतर्फी कारभारावर खडेबोल सुनावले आहेत. रेखा राऊत, शैला गोडसे, राणी वारे, स्वाती कांबळे, मंगल वाघमोडे, पंचायत समिती सभापती रजनी भडकूंबे यांनी सदस्यांचा मुलभूत अधिकार प्रशासन हिरावून घेत असल्याचा आरोप केला आहे.
ऑनलाईन ऑफ लाईन सभेवरून सदस्य आणि प्रशासनात वाद निर्माण होत आहे. ४ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. ऑफलाईन सभा घेण्यासाठी सदस्यांनी अध्यक्ष कांबळे यांना घेराव घातला होता. तीन दिवसानंतर (मंगळवारी) स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमाचा गर्दी जमवून ऑनलाईन पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याची सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांकडून होत आहे.