वारणानगर : पन्हाळगडावर जाणारा मुख्य रस्ता भूस्खलनाने खचला आहे. गडावर जाणारा कोणताही पर्यायी मार्ग नसून रस्ता दुरुस्त होईपर्यंत सर्वच तालुकास्तरीय कार्यालये तात्पुरती कोडोली येथे स्थलातंरीत करून जनतेची सोय करावी, अशी मागणी कोडोली व्यापारी असोसिएशनने आमदार विनय कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
व्यापारी असोसिएशनने दिलेल्या निवेदनात पन्हाळ गडावर जाणारा रस्ता गेल्यावेळेला खचला. त्यावेळी देखील तालुकास्तरीय कार्यालयातील सर्व शासकीय कामे ठप्प झाली होती. एखादा प्रसंग घडल्यावर पन्हाळ्यावर जाण्यासाठी पर्यायी रस्ता हवा, अशी मागणी होते. तथापि, शासनस्तरावर कोणत्याच प्रक्रिया पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला फक्त चर्चा होते. सध्या खचलेला रस्ता कायम सुरळीत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल तोपर्यंत सर्व शासकीय कामकाज सोयीच्या ठिकाणी चालू करून जनतेची गैरसोय टाळावी, अशी मागणी केली आहे.
शासकीय सेवेत बाहेरून येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना तीन दरवाजा मार्ग किंवा बुधवार पेठेत वाहने लावून चालत कार्यालयात जावे लागेल. जनतेला देखील सर्वच कार्यालयात चालत जाणे शक्य नाही. याशिवाय अपंग, वयोवृध्द नागरिकांना तसेच शासकीय कर्मच्याऱ्यांना अशा परिस्थितीत गडावर जाणे शक्य नाही. प्रांताधिकारी, तहसीलदार, निबंधक
कृषी, पंचायत समिती, न्यायालय, भूमी अभिलेख यासह दैनंदिन नागरिकांना कामकाजासाठी आवशक असणारी कार्यालये तात्पूरत्या कालावधीसाठी कोडोली येथे स्तलातंरीत करणे जनतेच्या सोयीचे व हिताचे ठरणार आहे.
कोडोली तालुक्यातील पन्हाळा पूर्व भागाचे मध्यवर्ती ठिकाण असून, पूर्व भागातील सर्व गावे नोकरी, शिक्षण, उद्योग व बाजारपेठ यासाठी कोडोलीला कायम जोडलेली आहेत. त्यामुळे तालुकास्तरीय कार्यालये तात्पुरती स्थलातंरीत करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलावीत, असे आदेश देण्यात यावेत अशी मागणी देखील निवेदनात व्यापारी असोसिएशनने केली आहे.