मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचे आज वयाच्या 85 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. डॉ स्नेहलता देशमुख या 1995 ते 2000 या काळात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु होत्या. त्या अगोदर त्या शिव रुग्णालयात (सायन रुग्णालयात) अधिष्ठाता पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले होते. विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर त्यांनी आईचे नाव लिहण्याचा निर्णय हा त्यातील सर्वात महत्वाचा निर्णय होता. गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी ग्रंथ स्नेहलता देशमुख यांनी लिहले आहेत. डॉ. देशमुख यांना सामाजिक कार्यासाठी ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’, हे पुरस्कार मिळाले होते. सध्या त्या मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून त्या कार्यरत होत्या.
डॉ. स्नेहलता देशमुख यांचा परिचय
स्नेहलता देशमुख यांचे वडील म्हणजे डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे शस्त्रक्रियेची (सर्जरीची) प्रख्यात डॉक्टर होते. मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत स्नेहलता देशमुखही डॉक्टर झाल्या. यशाची अनेक शिखरं त्यांनी गाठली होती.
डॉ. देशमुख यांचे शालेय शिक्षण आणि इंटरपर्यंचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची शाळा आणि रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस.ला सर्वप्रथम आल्या होत्या. पुढच्या शस्त्रक्रियेच्या शिक्षणासाठी टाटा रुग्णालयामध्ये गेल्या. पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला; कारण त्या वेळी कर्करोगावरच्या शस्त्रक्रियेसाठी मुलींना प्रवेश दिला जात नसे. स्नेहलता देशमुख यांनी टाटा रुग्णालयात प्रवेश मिळावा म्हणून खूप संघर्ष केला; पण त्यांना यश आलं नाही. अखेरीस त्यांनी जी.एस. महाविद्यालयात अर्भकांवरची शस्त्रक्रिया विषयात पुढील शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विख्यात शल्यविशारद म्हणून त्यानी ख्याती मिळवली.
त्यांनी वयाच्या पन्नाशीत वैद्यकीय प्रशासकाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी खास दिल्लीला जाऊन वैद्यकीय प्रशासनाचा (हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्या ठिकाणी त्यांचे वडील अनेक वर्षे अधिक्षक म्हणून कार्यरत होते त्या त्या शीव येथील लोकमान्य टिळक तिथेच त्या १९९० साली अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्या. पुढे त्या विद्यापीठाच्या कुलगुरु झाल्या. कुलगुरुपदावरुन निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी शिक्षण क्षेत्रात योगदान देणे सुरु ठेवले होते.