प्रतिकात्मक फोटो
इचलकरंजी : इचलकरंजी परिसरातील खून सत्रांची मालिका (Murder in Ichalkaranji) काही केल्या थांबताना दिसत नाही. शनिवारी रात्री उशिरा येथील तारदाळ हद्दीलगत असलेल्या प्राईड इंडिया पार्कच्या सांगले मळ्यातील पाणंद रस्त्यावर एका ४० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाला.
कोरोची (ता. हातकणंगले) येथील संदीप घट्टे असे या युवकाचे नाव असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. हल्लेखोरांनी संदीप घट्टे याच्या चेहऱ्यावर अनेक वार करुन चेहरा ओळखू नये अशी स्थिती केली होती. हा खून मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मागील शनिवारीच जवाहरनगर परिसरात खुनाची घटना घडली असताना पुन्हा आज खून झाल्याने शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इचलकरंजी जवळील तारदाळ हद्दीतील प्राईड इंडिया पार्क या नावाने औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक उद्योग आहेत. या वसाहतीलगत सांगले मळा पाणंद रस्ता परिसरात आज पहाटे कामगार कामावर जात असताना एका युवक रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले.
याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. संबंधित युवकाच्या तोंडावर प्रचंड वार केल्याने चेहरा विद्रूप झाल्याने हा युवक नेमका कोण याची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी तातडीने याबाबत तपास सुरू केला. त्यानंतर हा युवक कोरोची येथील पानपट्टी चालक असल्याचे पुढे आले. व्यावसायिक स्पर्धेतून की आणखी कोणत्या कारणातून हा खून झाला, याबाबत प्राथमिक अंदाज पोलिस घेत आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देऊन या खून प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान, गेल्या आठवड्यात इचलकरंजी शहरातील जवाहरनगरसारख्या एका महत्त्वाच्या भागात युवकाचा खून झाला होता. त्यानंतर लगेचच आज दुसरा खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.