नवी दिल्ली – जय जय महाकाल..! अशा जयघोषात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैनमधील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ‘महाकाल लोक’च्या नवीन संकुलाचे लोकार्पण केले. यावेळी सर्वत्र मंत्राचा प्रतिध्वनी ऐकायला येवू लागला. रक्षासूत्रापासून (कळव) बनवलेल्या 15 फूट उंचीच्या शिवलिंगाच्या प्रतिकृतीवरील रिमोटद्वारे पडदा हटवून मोदींनी लोकार्पण केले. अध्यात्माचे हे नवे प्रांगण सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.
तत्पूर्वी मोदींनी महाकालाचे दर्शन घेऊन प्रणाम केला. महाकालाला चंदन, मोगरे आणि गुलाबाची माळ अर्पण करून पवित्र धागा अर्पण केला. सुका मेवा, फळे अर्पण केली. दक्षिणा दिली. सायंकाळच्या आरतीतही ते सहभागी झाले. महाकालच्या दक्षिण दिशेला बसून रुद्राक्ष जपमाळ लावून तीन मिनिटे ध्यानधारणा केली. .
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ‘महाकाल लोक’च्या नवीन दर्शन संकुलाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैन येथे पोहोचले. ते प्रथम अहमदाबादहून विशेष विमानाने इंदूर आणि तेथून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने उज्जैनला पोहोचले. हेलिपॅडवरून पंतप्रधान मोदी थेट महाकाल मंदिरात पोहोचले. गर्भगृहात नंदीला नमस्कार करून महाकालाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात पूजेला सुरुवात झाली आहे.
मोदी उज्जैनमध्ये सुमारे 3 तास कार्यक्रमस्थळी थांबले. सायंकाळी 6.30 वाजता उज्जैनमध्ये सुमारे 200 संतांच्या उपस्थितीत त्यांनी ‘महाकाल लोक’चे उद्घाटन केले. कार्यक्रमस्थळी वॉटर प्रूफ डोम बांधण्यात आला असून, तेथे 60 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान क्षिप्रा नदीच्या काठावर हा कार्यक्रम दाखवण्यासाठी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. येथे सुमारे एक लाख लोक जमण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम 40 देशांमध्ये थेट दाखवला जात आहे.
वाराणसीतील काशी विश्वनाथानंतर देशातील दुसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराचे नवे रूप बहरले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह दोनशे संत महतांच्या आणि सुमारे 60 हजार लोकांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ‘महाकाल लोक’ चे लोकार्पण झाले. महाकाल लोक प्रकल्प 856 कोटींचा निधी खर्चून दोन टप्प्यात विकसित करण्यात आला. 2.8 हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता 47 हेक्टरचे झाले आहे. यात 946 मीटर लांबीचा कॉरिडॉर असणार आहे. ज्यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोहोचणार आहेत.