आज अलेक्झांडर सारखा सारखा टीव्हीकडे जाऊन आईकडे येऊ लागला. आईने त्याच्याकडे लक्ष न दिल्याने मग त्याने आईच्या साडीचा पदर धरुन टीव्हीपर्यंत तिला आणलं.
‘याला काय बरं सांगायचं असेल?’, तेजोमयीने आईला विचारलं.
‘काय रे ठोंब्या, काय सांगायचय तुला?’ आईने हलकीशी चापट मारत त्याला विचारलं.
‘त्याला टीव्ही बघायचा असेल, दुसरं काय?’ बाबा तिरकस हसत म्हणाले. ते अलेक्झांडरला कळलं असावं, म्हणून त्याने बाबांकडे रागानं बघीतलं.
‘तुमच्यासारखा नाही हो तो?’ अलेक्झांडरची बाजू घेत आई म्हणाली.
‘माझ्यासारखा म्हणजे?’
‘सटीचि!’ आई चटदीशी बोलून गेली.
‘ऑं!’ एकाच वेळी बाबा व तेजोमयीने आश्चर्य व्यक्त केले.
‘सटीचि म्हणजे सदैव टीव्ही चिपकू! हा हा हा!’ आई जोरात हसत म्हणाली. उडी मारुन आईच्या आनंदात अलेक्झांडर सहभागी झाला. लगेच तो पुन्हा टीव्हीकडे गेला.
‘हे घ्या, मी नाही, तुमचा लाडकोबाच सटीचि, आहे.’ बाबा उत्तरादाखल म्हणाले.
‘अहो पण बाबा, आता तर टीव्ही बंद आहे. मग याला टीव्ही सुरु करुन हवा आहे का?’ तेजोमयीने विचारलं.
‘काय रे सुरु करायचा का टीव्ही?’ बाबांनी अलेक्झांडरला विचारलं. तेव्हा त्याने नापसंतीची मान हलवली. कुंईकुंई केलं.
‘अहो, त्याला टीव्ही नको आहे आत्ता.’ आई म्हणाली.
‘मग?’
‘बाबा आज तारीख कोणती?’ तेजोमयीनं विचारलं.
‘३१ डिसेंबर.’
‘आज आपण काय करतो?’
‘टीव्हीवरचे कार्यक्रम बघतो, बारा वाजेपर्यंत. याचा अर्थ अलाक्झांडरलाही टीव्ही बघायचाय वाटतं.’ बाबा त्याच्याकडे बघत म्हणाले. अलेक्झांडरने पुन्हा नकारार्थी मान हलवली. आईकडे त्याने बघीतले.
‘बाबा, टीव्ही बघायचंय का असं विचारलं की, हा नाही म्हणतोय हो. मग याला काय सांगायचं असेल बरं?’ तेजोमयीनं विचारलं.
‘मला कळलय ना…’ आई म्हणाली.
‘काय ते?’ बाबा व तेजोमयीनं एकाच वेळी विचारलं.
‘आज टीव्ही बघायचा नाही.’
‘३१ डिसेंबरला टीव्ही बघायचा नाही म्हणजे, फारच अतिरेक झाला बुवा.’ बाबा त्राग्याने म्हणाले.
‘कसला अतिरेक? नवीन वर्षाच्या स्वागताचे म्हणून काहीबाही पांचट कार्यक्रम बघायचे नि वेळ घालवायचा. जागरण करायचं. उशीरा झोपायचं नि नव्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी आळस करत उठायचं. हा अतिरेक नाही का?’ आई म्हणाली.
‘पण याला कसं कळलं, आज ३१ डिसेंबर आहे ते?’ तेजोमयीनं विचारलं.
‘आपण बोलत नसतो का सारखं, ते त्याला बरोबर कळलं असणार? जसं याचं तिखट नाक तशीच तीक्ष्ण बुध्दीसुध्दा! गेल्या वर्षीचा ३१ डिसेंबरचा आपला सटीची पराक्रम आठवला असणार त्याला.’ आईने तर्क मांडला.
‘मग बाबा, काय यंदाही सटीचीचा अतिरेक करणार की प्रिंस अलेक्झांडरचं ऐकणार?’ तेजोमयी बाबांकडे कटाक्ष टाकत म्हणाली.
‘त्याचं ऐकाल तर आज लवकर झोपून नव्या वर्षांच स्वागत प्रसन्नतेनं करु शकाल. नाही ऐकलं तर टीव्हीवर उडी घेऊन त्याने तो पाडला तर नुकसान करुन घ्याल. मी त्याला जरासुध्दा रागावणार नाही. मग, नव्या वर्षाची प्रसन्नता हवी की नव्या वर्षात नुकसान? तुमचं तुम्ही ठरवा.’ आई अलेक्झांडरला कुरवाळीत म्हणाली.
‘नुकसानीपेक्षा प्रसन्नता कितीतरी पटीने परवडली’, असं म्हणून बाबांनी आज टीव्ही बघणार नाही, हे अलेक्झांडर समोर गुडघ्यावर बसून त्याला सांगितलं.
दॅटस लाईक अ गूड बॉय, अशा थाटाचे भाव आणत अलेक्झांडर स्वारी डौलात आईच्या पाठीमागे स्वयंपाक खोलीकडे गेली.
– सुरेश वांदिले