संग्रहित फोटो
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) बचावासाठी आणखी एक लस ZyCoV-D या लसीचा पुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे. या लसीचे वैशिष्ठ्य म्हणजे ही लस नीडल फ्री (Needdle free vaccine) आहे. म्हणजेच ही लस घेण्यासाठी इंजेक्शनच्या सुईचा त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र इतर बाजारात उपलब्ध असलेल्या लसींप्रमाणे या लसीचे दोन नाही तर तीन डोस घ्यावे लागणार आहेत. डीएनए बेस आणि नीड फ्री अशी ही जगातील पहिलीच लस आहे.
अहमदाबादची फार्मा कंपनी झायडस कैडिला यांनी ही लस विकसीत केली आहे. बुधवापरासून या लसींचा पुरवठा केंद्र सरकारला करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केंद्राने या लशीच्या १ कोटी डोसची ऑर्डर सध्या दिलेली आहे. ज्यांनी आत्तापर्यंत कोरोनाची एकही लस घेतलेली नाही, त्यांना ही लस देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातही होणार उपलब्ध
कंपनीने ZyCoV-D या लसीचा पुरवठा केंद्र सरकारबरोबरच सात राज्यांना करण्यास सुरुवात केली आहे. त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, उ. प्रदेश, प. बंगाल, बिहार, पंजाब आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.
लवकरच ही लस कंपनीतर्फे खासगी मेडिकल स्टोअर्समध्येही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या लसीची किंमत २६५ रुपये आहे. तर लस घेण्यासाठी लागणारे उपकरण एप्लिकेटर ९३ रुपयांना वेगळे खरेदी करावे लागणार आहे. याची एकूण किंमत ३५८ रुपये असेल. २८ दिवसांच्या अंतराने या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. दुसरा डोस २८ व्या दिवशी, तर तिसरा डोस ५६ व्या दिवशी घ्यावा लागेल. या लसीची साठवणूक २ ते ८ डिग्री तापमानात करावी लागेल. कंपनीने वर्षाला १० ते १२ कोटी डोस निर्मितीचे प्लॅनिंग केले आहे.
१२ वर्षांवरील सर्वांना घेता येणार ही लस
ZyCoV-D लस, सध्या सात राज्यातील लोकांनाच देण्यात येणार आहे. १२ वर्षांवरील सर्वांना ही लस घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिलेली आहे. १२ ते १८ वयोगटासाठी आपतकालीन वापरासाठी या लसीला आधीच मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलाही मुलांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.