मुंबई : मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) आज मोठ्या थाटामाटात विसर्जन झाले. १० दिवसांत लालबागच्या राजाला लाखो भाविकांनी भेट दिली. अनेकांनी नवस फेडले. पण देशातल्या एका महत्त्वाच्या यात्रेने लालबागच्या राजासारखाच एक विक्रम रचला आहे.
चारधाम यात्रेला (Chardham Yatra) आठवडाभरापूर्वी दररोज पाच हजार भाविक (Devotees) पोहोचत होते. आता या आठवड्याच्या सुरुवातीपासून हा आकडा २५ हजारांहून अधिक झाला आहे. चार महिन्यांत भाविकांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली असून हा एक विक्रम (Record) आहे. यापैकी सर्वाधिक ११ लाख भाविक केदारनाथला (Kedarnath) पोहोचले आहेत. यात्रेचा अवघा दीड महिना बाकी आहे.
केदारनाथला जाण्यासाठी प्रवाशांना त्यांची वाहने सोनप्रयाग येथे उभी करावी लागतात. गेल्या रविवारपर्यंत येथील वाहनतळ रिकामे होते; मात्र आता ते पूर्ण भरले आहे. सायंकाळी ५ वाजता गुप्तकाशी ते सीतापूर हा जाम रात्री ११ वाजता उघडला.
सोनप्रयागमधील एका हॉटेलचे मालक सांगतात की, त्यांच्या हॉटेलमध्ये दहा खोल्या आहेत. गेल्या आठवड्यात सर्व रिकाम्या होत्या. परंतु, आता बुकिंग ३० ऑक्टोबरपर्यंत फुल्ल आहे. यावर्षी मे-जूनमध्ये, जिथे चारधाम मार्गावरील हॉटेल रूमच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तिथे आता सामान्य खोलीचे भाडे १५०० रुपयांपर्यंत आहे.
पावसाळ्यानंतर ऑल वेदर रोडची अवस्था खराब आहे. दर ५ किमीवर डोंगराला तडे गेले असून रस्त्यावर दगड पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ऋषिकेश ते व्यासीपर्यंत चार ठिकाणी डोंगर फुटून दगड रस्त्यावर आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे.
खराब हवामानामुळे हेली कंपन्यांनी सेवा बंद केली होती. या आठवड्यापासून ९ कंपन्यांनी सेवा सुरू केली असून आता सप्टेंबरपर्यंत बुकिंग फुल झाले आहे. ही हेलिकॉप्टर सेवा गुप्तकाशी ते केदारनाथ अशी आहे. त्याचे भाडे ७५०० रुपये प्रतिव्यक्ती आहे.