भारताच्या उद्योगजगताचा चेहरा असलेले, परोपकारी उद्योगपती आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचे दि. 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. अख्खा देश शोकाकुल झाला होता. त्यांचे दातृत्व आणि समाजसेवा ही सदैव प्रेरणादायी ठरणार आहे. रतन टाटा अध्यक्ष असलेल्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांचे सावत्र बंधु नोएल टाटा यांची आज दि. 11 ऑक्टोबर रोजी निवड करण्यात आली.
” आज मुंबईमध्ये टाटा ट्रस्टचा समावेश असलेल्या विविध ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन एन टाटा यांच्या निधना शोक व्यक्त करण्यात आला त्यावेळी त्यांनी केवळ टाटा समूहासाठीच नव्हे, तर त्यांनी केलेल्या सेवांचे स्मरण केले गेले. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नोएल नवल टाटा यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांची नियुक्ती तात्काळ लागू झाली आहे.
दिवंगत रतन टाटा यांनी लग्न केले नसल्याने त्यांना वारस नव्हता तसेच त्यांनी टाटा ट्रस्टमध्ये उत्तराधिकारी कोण असणार याचे नावही दिले नव्हते. नोएल यांची नियुक्ती महत्त्वाची आहे कारण टाटा ट्रस्ट्कडे टाटा सन्सची तब्बल 66% मालकी आहे, टाटा ब्रँड अंतर्गत विविध कंपन्यांची होल्डिंग ही 150 वर्षांहून अधिक जुनी आहे.
राष्ट्र उभारणीत आमची भूमिका निभावण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करतो
“माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीमुळे मी अत्यंत सन्मानित आणि नम्र आहे. रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यास मी उत्सुक आहे. एक शतकापूर्वी स्थापन झालेली टाटा ट्रस्ट ही सामाजिक हिताचे काम करण्यासाठी एक अद्वितीय साधन आहे. या पवित्र प्रसंगी, आम्ही आमच्या विकासात्मक आणि परोपकारी उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत आमची भूमिका निभावण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करतो,” नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीबद्दल सांगितले. आपल्या पहिल्याच संबोधनात राष्ट्रहिताची बात करत नोएल टाटा यांनी टाटांचा आणि रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचा दृष्टीकोन समोर ठेवला.
नोएल टाटा यांच्याविषयी
नोएल टाटा हे 67 वर्षाचे आहेत. ते दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. नोएल टाटा हे ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशचे अध्यक्ष आहेत. तसेच ते टाटा इंटरनॅशलचे व्यवस्थापकीय संचालक असून टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत .नोएल यांचे शिक्षण युकेच्या ससेक्स विद्यापिठातून पदवी प्राप्त केली आहे. फ्रान्सच्या इनसिड बिझनेस स्कूलमधूनही त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांचे लग्न टाटा सन्समधील मोठे भागधारक असलेल्या पालोनजी मिस्त्री यांची कन्या आलू मिस्त्री यांच्याशी झाले आहे. त्यांना माया, नेविल आणि लीया अशी तीन मुले आहेत. नेविल यांचे लग्न किर्लोस्कर उद्योगघराण्यातील मानसी किर्लोस्कर यांच्याशी झाले आहे.