ॲमेझोन प्राईमवरील ‘मुंबई सागा’(Mumbai Saga) या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळपणे, मानहानीकारक चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते यांना कायदेशीर नोटीस(Notice to producers of Mumbai Saga) पाठवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी ३१ मे रोजी ही नोटीस पाठवली आहे. चित्रपटातील संबंधित प्रसंग, संवाद त्या चित्रपटातून काढून टाकावेत व बिनशर्त माफीही मागितली जावी, अशी मागणी त्यांनी या नोटिशीत केली आहे. त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी ही नोटीस बजावली आहे.
‘मुंबई सागा’(Mumbai Saga) चित्रपटातील एका प्रसंगात संघाची मानहानी होत आहे. संघ व स्वयंसेवकांबाबत चुकीचा संदेश समाजात जात असल्याचेही भिंगार्डे यांनी पाठवलेल्या या नोटीशीत म्हटले आहे. मुंबई सागा या चित्रपटातील अभिनेत्यांच्या तोंडी असलेल्या संवादातून कोण्या भाऊच्या संघटनेचा उल्लेख केला गेला आहे. या भाऊच्या संघटनेतील सदस्य रा स्व संघाच्या गणवेशात स्पष्टपणे दाखवले आहेत. तसेच हा चित्रपट सत्यघटनेतून प्रेरित असल्याचे सुरुवातीलाच सांगितले गेले आहे.
[read_also content=”बॉलिवूड अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात याचा आकडा माहितेय का? अनुष्का शर्मा आहे नवव्या नंबरवर! https://www.navarashtra.com/latest-news/list-of-heighest-paid-actress-in-bollywood-nrst-137240.html”]
भिंगार्डे म्हणाले की, या चित्रपटात संघाचे केलेले चित्रण पाहून मला अत्यंत दुःख झाले. भाऊची सेना या नावाने असलेल्या संघटनेत संघाच्या गणवेशात, हातात दंड घेऊन शाखेत ज्याप्रमाणे ध्वजाला प्रणाम करतो तशा प्रकारे प्रणाम करणारे स्वयंसेवक दाखवले आहेत. अनेक स्वयंसेवक पोलीस खात्यात जातात आणि नंतर भ्रष्टाचार करतात, असेही या चित्रपटातील संवादाद्वारे म्हटले गेले आहे. मी स्वतः संघाचा स्वयंसेवक आहे. संघाची संपत्ती म्हणजे त्यांचे स्वयंसेवक. केवळ संघाच्याच नव्हे तर माझ्यासारख्या सामान्य स्वयंसेवकाच्या प्रतिमेवरही या चित्रणामुळे व संवादांमुळे शिंतोडे उडवले गेले आहेत.
साळसिंगीकर म्हणाले, चित्रपटात संघाच्या गणवेशातील स्वयंसेवकांचे फोटो दाखवले आहेत. यातून संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. या चित्रपटातील संबंधित चित्रण व संवाद काढून टाकावेत. ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित प्रसंग व संवाद चित्रपटातून काढून टाकले जावेत. तसेच ही बदनामी केल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी व त्याला प्रसारमाध्यमातून व्यापक प्रसिद्धी दयावी, अशी मागणी आम्ही या नोटिशीद्वारे केली आहे.
‘मुंबई सागा’ हा हिंदी चित्रपट १९ मार्च रोजी ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. इम्रान हाश्मी व जॉन अब्राहम यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. संजय गुप्ता हे या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक असून कृष्णकुमार, अनुराधा गुप्ता, संगीता अहीर हे देखील निर्माते आहेत.
सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मार्फत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. संजय गुप्ता व अन्य निर्मात्यांसह भूषण कुमार दुआ (व्यवस्थापकीय संचालक), दिव्या दुआ, सुदेश दुआ, खुशाली दुआ, तुलसीकुमार राल्हान इत्यादी सुपर कॅसेटमधील विविध अधिकारी, व्हाईट फेदर फिल्म्सचे हनीफ अब्दुल रझाक चुनावाला अशा अनेकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.