RSS बंदीच्या मागणीवर देवेंद्र फडणवसींचा प्रियांक खर्गेंवर पलटवार
Devendra Fadnavis on Priyank Kharge: कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच, प्रियांक खर्गे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची माहणी केली आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.
यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर इंदिरा गांधी यांना पद सोडावे लागले होते. अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच प्रियांक खर्गे प्रसिद्धीकरता अशा गोष्टी करत आहेत. त्यांना काहीच स्टॅंडिंग नाही. ते वडिलांच्या भरवशावर राजकारण करत आहेत. पण त्यांना एवढचं सांगतो, संघावर अनेकवेळा बंदी घालण्याचा प्रयत्न कऱण्यात आला होता. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली होती. त्यांना नंतर सत्तेतून पायउतार व्हाव लागलं होतं.” अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
फडणवीस म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्तीचे संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मुल्याधिष्ठीत अशा मानवनिर्मितीचे कार्य संघाकडून होत असते. त्यामुळे प्रसिद्धिसाठी अशा प्रकारचे पत्रे देत असतात त्याकडे आम्ही ढुंकूनही पाहात नाहीत.”
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शासकीय व मान्यताप्राप्त शाळांमधील तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
खर्गे यांनी पत्रात म्हटलं आहे की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रदर्शनं आयोजित करते. या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या घोषणांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक विचारांची पेरणी केली जात आहे. काठ्या घेऊन प्रचारफेऱ्या काढल्या जातात, ज्यामुळे निरागस मुलं आणि तरुणांची मानसिकता नकारात्मक बनत आहे. शासकीय शाळा, सरकारमान्यताप्राप्त शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसकडून आयोजित सर्व कार्यक्रमांवर — जसे की शाखा, बैठका, सांघिक आणि परेड — यांवर संपूर्ण बंदी घालावी.”